कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश आले असून, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना अधिकृत थांबा देण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोकणातील हजारो प्रवाशांची वर्षानुवर्षांची गैरसोय दूर होणार असून, रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि सोयीचा होणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सावंतवाडी रोड स्थानकावर लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्सप्रेस (१२२०१/१२२०२) तसेच अन्य महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची मागणी केली होती. या मागणीत त्यांनी कोकणातील नागरिकांची वाढती प्रवासी संख्या, पर्यटन, शिक्षण, रोजगार, वैद्यकीय उपचार आणि व्यावसायिक कारणांसाठी होणाऱ्या प्रवासाचा सविस्तर उल्लेख करत ही मागणी तातडीने मान्य करण्याची विनंती केली होती. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने आता सावंतवाडी रोड स्थानकावर महत्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्यास मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण तसेच परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत या गाड्यांसाठी प्रवाशांना कणकवली किंवा इतर स्थानकांवर जावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि अतिरिक्त प्रवासाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता सावंतवाडी रोड स्थानकावरच या गाड्या उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.
या निर्णयाचा सर्वाधिक लाभ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे तसेच देशातील विविध भागांत शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी जाणाऱ्या युवकांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिला प्रवाशांना, रुग्णांना तसेच दिव्यांगांना होणार आहे. याशिवाय कोकणातील पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग गाठणे अधिक सुलभ होणार असून, स्थानिक व्यापार, हॉटेल व्यवसाय आणि पर्यटन उद्योगालाही या निर्णयाचा सकारात्मक फायदा होईल.
नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी आणि कोकणातील रेल्वे सुविधांमध्ये सातत्याने वाढ व्हावी, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने कोकणातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, या निर्णयाबद्दल प्रवाशांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. तर या निर्णयाबद्दल खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
या गाड्यांना मिळाला थांबा- १२१३३ / १२१३४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मंगळुरू एक्सप्रेस- १२४३१ / १२४३२ तिरुवनंतपुरम सेंट्रल - हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस- १२२०१ / १२२०२ लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्सप्रेस

