Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

दिव्यात 'विटामिन ए' औषधाचा तीव्र तुटवडा; ७ दिवसांत पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख सचिन पाटील यांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र; बालकांच्या आरोग्याशी खेळ थांबवण्याची मागणी

दिवा | प्रतिनिधी : दिवा प्रभाग समिती अंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये तसेच आशा वर्कर्सकडे लहान मुलांसाठी अत्यावश्यक असलेल्या 'विटामिन ए' औषधाचा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तीव्र तुटवडा निर्माण झाला असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ठाणे महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत तातडीने औषधांचा पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना 'विटामिन ए'चे डोस नियमित देणे आवश्यक आहे. या औषधामुळे बालकांमधील कुपोषण, अंधत्वाचा धोका कमी होतो तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून औषध उपलब्ध नसल्यामुळे दिव्यातील शेकडो गरीब व गरजू कुटुंबांतील बालके या महत्त्वाच्या डोसपासून वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सचिन पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (NHM) नियमानुसार बालकांना वेळेवर 'विटामिन ए' उपलब्ध करून देणे हा त्यांचा आरोग्यविषयक हक्क असून औषधांचा अखंडित साठा राखणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत निर्माण झालेला तुटवडा हा बालकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखा प्रकार असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवसेनेच्या प्रमुख मागण्या :

दिवा प्रभागातील सर्व आरोग्य केंद्रे व आशा वर्कर्सना पुढील ७ दिवसांत 'विटामिन ए'चा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा.

गेल्या तीन-चार महिन्यांपासून औषधांचा पुरवठा का खंडित झाला, याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

प्रशासनाने सात दिवसांच्या आत सकारात्मक पावले उचलून औषधांचा पुरवठा सुरळीत केला नाही, तर स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्यासोबतच प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने लढा उभारला जाईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |