युवकांचा उत्स्फूर्त सहभाग..
नवी मुंबई (प्रतिनिधी) : आषाढी एकादशी वारीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील कोपरखैरणे गावातील श्री विठ्ठल रखुमाई सेवा वारकरी मंडळाच्या वारकऱ्यांचा भक्तिमय उत्साह यंदाही पाहायला मिळत आहे. गेल्या २८ वर्षांपासून मंडळाच्या वतीने पायी पंढरपूर वारीची परंपरा अखंडपणे सुरू असून, यंदाही मोठ्या उत्साहात दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.
दिंडीचे मार्गदर्शक ह.भ.प. सोपान (महाराज) आदितवार म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दिंडीचे भजन चालक ह.भ.प. ज्ञानराज महाराज म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पायी वारी करत आहेत.
यंदाच्या वारीचे विशेष आकर्षण म्हणजे युवकांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. ज्येष्ठ वारकऱ्यांसोबत युवा पिढीही टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात तल्लीन होत विठुरायाच्या दर्शनासाठी पायी मार्गक्रमण करत आहे.
या वारीत नुकतेच नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेले कीर्तनकार ह.भ.प. विशाल महाराज पाटील (कोपरी) तसेच पखवाज वादक कु. ह.भ.प. धनंजय रामेश्वर वेटा यांचाही सहभाग लाभला आहे.
याशिवाय नकुल महाराज, नामदेव महाराज (विणेकरी), विशाल महाराज, धनंजय महाराज, धनुर्धर महाराज, पुंडलिक महाराज, राजेंद्र मोरे, राम हिवसे, दीपक महाराज, रामेश्वर वेटा, संतोष, रवींद्र, पांडुरंग, धर्मेंद्र, ऋषिकेश ठाकूर, माऊली ठाकूर (पखवाज वादक), जय हरी यांच्यासह अनेक वारकरी सहभागी झाले आहेत.
महिला वारकऱ्यांमध्ये महिंद्रा म्हात्रे, गीता वेटा, कामिनी, वैशाली, मेघा, लक्ष्मी, ऋतुजा, मंथना, पार्वती धपाटे, पदमा, इंदुबाई, हेमा तसेच युवा वारकरी कु. भवित देवेंद्र पाटील यांच्यासह अनेक महिला भाविकांनीही उत्साहाने सहभाग नोंदविला आहे.
टाळ-मृदुंगाच्या निनादात, हरिनामाच्या अखंड गजरात आणि विठ्ठलभक्तीच्या वातावरणात ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने पुढे सरकत असून, कोपरखैरणेतील वारकरी परंपरा अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे. युवकांचा वाढता सहभाग ही वारकरी संप्रदायाच्या परंपरेसाठी आशादायी बाब असून, ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास निश्चितच हातभार लागेल, अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली.
ही माहिती ग्रामस्थ अविनाश भरत पाटील यांनी दिली.

