Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

सर्पमित्राच्या सतर्कतेमुळे घणसोलीत सहा फुटी धामणला जीवदान

मच्छीमाराच्या जाळ्यात अडकलेल्या बिनविषारी सर्पाची सुखरूप सुटका; गवळी देव पक्षी अभयारण्यात सोडले

घणसोली | प्रतिनिधी : घणसोली येथील अर्जुनवाडी परिसरात मच्छीमारासाठी लावलेल्या मोठ्या जाळ्यात सुमारे सहा फूट लांबीचा धामण जातीचा सर्प अडकून पडल्याची घटना गुरुवार (१६ जुलै) रात्री घडली. सर्पमित्राच्या तत्परतेमुळे या बिनविषारी सर्पाला सुरक्षित जीवदान मिळाले.

रात्रीच्या वेळी गारव्याच्या शोधात बाहेर पडलेला हा धामण एका व्यक्तीच्या निदर्शनास आला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने तातडीने घणसोली येथील सर्पमित्र सुरेश मल्हारी खरात यांच्याशी संपर्क साधला. घटनास्थळी पोहोचलेल्या खरात यांनी जाळ्यात अडकलेल्या धामणची काळजीपूर्वक सुटका करून त्याला सुरक्षितरीत्या पकडले.

याबाबत सर्पमित्र सुरेश खरात यांनी सांगितले की, पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्याने वन्यजीव गारव्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा.

सुटका करण्यात आलेल्या धामण सर्पाला घणसोली येथील गवळी देव पक्षी अभयारण्यातील सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. याबाबतची माहिती कोपरखैरणे येथील ग्रामस्थ अविनाश भरत पाटील यांनी दिली.

धामण हा बिनविषारी सर्प असून उंदीर व इतर लहान प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवून पर्यावरणाचा समतोल राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे अशा सर्पांना इजा न करता तज्ज्ञांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे गरजेचे असल्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |