Type Here to Get Search Results !

नापीक झालेल्या जमिनी संदर्भात चाणजे शेतकरी संघर्ष समितीची प्रशासनासोबत बैठक संपन्न.


समस्या मार्गी लावण्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांचे आश्वासन


उरण दि २२(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे चाणजे येथे सुमारे १०० हुन अधिक कुटुंब शेतकऱ्यांच्या २५० एकर जमिनीवर खारफुटीचे अतिक्रमण झाले आहे. शिवाय शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीचा इतिहास न पाहता सी.आर.झेड मध्ये दाखविल्याने स्वतःच्या मालकीची शेती असून सुद्धा शेतकरी (मालक )ही जमीन कोणाला विकू शकत नाही तसेच या क्षेत्रात कोणतेही पीक घेऊ शकत नाही.अशा गंभीर समस्या मध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या समस्येकडे लोकप्रतिनिधीसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच महाराष्ट्र शासनाने नेहमी दुर्लक्ष केले आहे. परिणामी स्वतःच्या मालकीची शेती असूनही येथील शेतकरी स्वतःच्या मूलभूत न्याय हक्कापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून श्री हनुमान मंदिर, कोंढरीपाडा, करंजा, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत चाणजे शेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्या न सुटल्याने येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर एकमताने बहिष्कार टाकून निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने शासकीय पातळीवर सदर समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांसोबत एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता मावळ लोकसभा मतदार संघ अंतर्गत असलेले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांनी चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे, सेक्रेटरी निशिकांत म्हात्रे यांना पत्र व्यवहार करून शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात दि २१/३/२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता जिल्हा परिषद शाळा जासई, तालुका उरण येथे आढावा बैठक आयोजित केली. या आढावा बैठकीत चाणजेचे तलाठी, मंडळ अधिकारी, प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते तर शेतकऱ्यांच्या वतीने चाणजे शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष अविनाश म्हात्रे, सेक्रेटरी निशिकांत म्हात्रे, उपाध्यक्ष कृष्णा पाटील व इतर शेतकरी उपस्थित होते.या बैठकीत सकारात्मक चर्चा व उपाययोजना झाल्या. लवकरच परत मिटिंग घेउन सदर समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांनी उपस्थितांना दिले.

मौजे चाणजे येथील २५० एकर भात शेती पीक जमीन सरकारच्या हलगर्जी पणामुळे बंधिस्त न बांधल्या मुळे समुद्राचे पाणी मोठया प्रमाणात शेतीत शिरून सदर जमीन नापीक व खारफुटी अतिक्रमित झाली आहे. संबंधित जमीन सुरक्षेसाठी बांधण्यात आलेला पाईप आऊटलेट स्ट्रक्चर (साकव )असलेले प्लॅप गेट १००% न लागल्यामुळे समुद्राचे पाणी शेतजमिनीत मोठया प्रमाणात शिरते. तसेच पाईप आऊटलेट स्ट्रक्चर(साकव )सुरक्षेसाठी लावण्यात आलेले हाईटगेज हटविल्या गेल्यामुळे बेकायदेशीर अवजड वाहतूक मोठया प्रमाणात होत आहे. परिणामी पाईप आऊटलेटला (साकव )तडा जाऊन तुटण्याच्या अवस्थेत आहे.सदर बाब चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे व इतर पदाधिकारी यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने मागण्या करण्यात आल्या त्या मागण्या खालीलप्रमाणे :- 

१)संबंधित सरकारी विभागाने बाधित शेती जमिनीचा योग्य तोडगा काढून न्याय मिळवून देणे.


 २)शेत जमिनीत येणारे समुद्राचे पाणी थांबण्यासाठी शंभर टक्के प्लॅप गेट लागले पाहिजे व पाईप आउटलेटच्या सुरक्षेसाठी योग्य ते नियोजन केले पाहिजे.


३)हटविण्यात आलेले हाईटगेज पूर्ववत करून होणारी बेकायदेशीर अवजड वाहतूक थांबली पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies