ठाणे, दि.२९ : ‘मी मतदान करणारंच.. आपणही मतदान करा आणि लोकशाही बळकट करा’ अशा घोषणा देत 25 ठाणे-लोकसभा मतदारसंघांतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी भास्कर कॉलनी येथील हजेरी शेड या ठिकाणी मतदान जनजागृती केली. स्वीप कार्यक्रमातंर्गत शहरात विविध ठिकाणी मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
१४८ ठाणे मतदार संघ सहा.निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज (२९ एप्रिल) सफाई कामगारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या ठिकाणी मतदान जनजागृतीपर सामूहिक घोषणा देऊन सफाई कामगारांना मतदान करण्यासाठी आवाहन करुन मतदानाची सामूहिक शपथ घेण्यात आली.
या मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या प्रत्येक सफाई कामगारांना मी मतदान करणारंच..... आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा या संदेशासह मतदानाची तारीख दर्शवणारे माहितीपत्रकाचेही वाटप करण्यात आले.
सर्व स्वच्छता सफाई कर्मचाऱ्यांना मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि मतदान आपला अधिकार आणि आपली जबाबदारी आहे याची जाणीव त्यांना करून देण्यात आली. सर्वानी आपल्या कुटूंबातील सदस्यांनी व तुम्ही राहता तेथील आजूबाजूच्या नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या आवाजात सामूहिक पणे "आम्ही राबऊ स्वच्छ्ता अभियान,पण तुम्ही करा हक्काने मतदान या घोषणे द्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.