कल्याण दि. 6 मे : कल्याण पश्चिमेतील भाजपच्या निवडणूक प्रचाराचे नियोजन उत्तमप्रकारे सुरू असल्याचे मत ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा जसजसा जवळ येत चालला आहे, त्यानूसार राजकीय पक्षांकडूनही मतदारसंघातील प्रचार आणि बैठकांनी वेग घेतल्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे कल्याण पश्चिमेत एकाच वेळी 28 प्रभागात आढावा बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर जगन्नाथ पाटील यांनी हे मत व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीचे पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी होणार आहे. त्याला आता अवघे दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. तर पुढील आठवड्यात 15 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कल्याणात आयोजित करण्यात आली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण लोकसभेतील महायुती उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील प्रचाराचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीचा आढावा या 28 प्रभागांतील बैठकांमध्ये घेण्यात आल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी दिली.
भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांच्यासह कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुक प्रमूख माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, कल्याण पश्चिम शहरप्रमुख वरुण पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस अमित धाक्रस, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, कल्याण जिल्हा सचिव सदा कोकणे आणि कल्याण शहर मंडल सरचिटणीस नितिन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व बैठका घेण्यात आल्या. या बैठकांना संबंधित प्रभागांतील शक्ती केंद्रप्रमूख, बूथ प्रमूख, वॉरियर्ससह प्रमूख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर सध्या सुरू असलेल्या प्रचाराला अधिक गती देण्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी आवश्यक असणारे नियोजन आणि महत्त्वाच्या सूचनाही या बैठकीतून देण्यात आल्याची माहिती जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे.
