Type Here to Get Search Results !

15 जून रोजी ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जनजागृती दिनी कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विशेष मेळावा

रत्नागिरी (प्रतिनिधी) : अलीकडच्या काळात कुटुंब व्यवस्थेत फार मोठे बदल झालेले असून विभक्त कुटुंब पद्धती अधिक वाढली आहे. 

ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जीवनातील अनुभव आणि ज्ञान लक्षात घेता समाज उपयोगी घटक म्हणून त्यांना राष्ट्राची संपत्ती मानली जाते. त्यांचा राष्ट्र उभारणीच्या कामात उपयोग करून घेता यावा म्हणून शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन धोरण अमलात आणले आहे. मात्र विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबाची व्याख्याच बदलून गेली असून राजा राणीच्या संसारात मुलांना आई-वडिलांची अडचण वाटू लागली आहे.  परिणामी समाजातील सुमारे 95% ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ज्येष्ठ  नागरिकांसमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत.                                

ज्येष्ठांच्या या छळाची जाणीव आंतरराष्ट्रीय संघटनांना देखील झाली असून भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारनेही ज्येष्ठ नागरिक धोरण अमलात आणून त्यांना आरोग्य आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळूवून देण्यासाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र कुटुंबातच ज्येष्ठांची होणारी अवहेलना थांबावी आणि त्यांच्यावर वृद्धाश्रमाचा आधार घेण्याची वेळ येऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ म्हणजेच फेस कॉम अधिक सक्रिय झाली आहे. यामुळे शासनाने आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 अमलात आणला आहे. मात्र या कायद्याचा प्रचार आणि प्रसार अपेक्षेप्रमाणे न झाल्याने महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने जनजागृतीचे विविध कार्यक्रम राज्यभरात हाती घेतले आहेत. त्यासाठी 15 जून हा जागतिक वयोवृद्ध म्हणजेच ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागरूकता दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो. या दिवशी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. ही चळवळ संपूर्ण समाजात गावोगावी पोहोचावी म्हणून महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने गाव तेथे नागरिक संघ स्थापनेची संकल्पना हाती घेतली आहे. जेणेकरून ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी ग्रामीण स्तरापर्यंत राबविण्यात मोठी मदत होत आहे.
                         
आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिक यांचा सांभाळ तसेच त्यांच्या भोजन, निवास, आरोग्य यांची योग्यरीत्या काळजी घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक चरितार्थ पालन पोषण कायदा 2007 अमलात आणला गेला आहे. या कायद्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी 15 जून हा ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिन म्हणून आयोजित केला जातो.  या कायद्यांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील उपविभाग स्तरावर महसूल खात्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना न्यायाधिकरण म्हणून नियुक्त केले गेले आहे. आई-वडील अथवा ज्येष्ठ नागरिकांना जेवण, निवास, औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आबाळ होत असेल तर या कायद्यानुसार त्यांना न्याय देण्याचे काम या प्राधिकरणाकडून अपेक्षित आहे. जिल्हास्तरावर प्रत्येक न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुकास्तरावर विधी सेवा समिती कार्यरत असून या समितीकडून कौटुंबिक कलह, मालमत्ता विषयक कलह समुपदेशन करून दूर करण्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन केले जाते. पोलीस खात्याला ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत.        

समाजातील बदलांमुळे ज्येष्ठांच्या कौटुंबिक समस्या ही वाढत आहेत. त्या दूर करण्यासाठी जेष्ठ नागरिक संघामार्फत ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक म्हणजेच ज्येष्ठ नागरिक अवहेलना प्रतिबंधक जनजागृती दिवस 15 जून रोजी साजरा करून ज्येष्ठांच्या कल्याणकारी कायद्याचा प्रचार आणि प्रसारासाठी कटिबद्ध झाले आहेत. या दृष्टिकोनातून रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव परिसर संघाच्या वतीने शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी सायंकाळी चार वाजता कुवारबाव येथे  ज्येष्ठ नागरिक भवनात जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात रत्नागिरी येथील मानवी हक्कांची जाणीव ठेवून सुमारे 24 वर्षे सामाजिक कार्य करणाऱ्या स्वयंसेतू या सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष श्रीमती श्रद्धा कळंबटे या ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टीने समाजप्रबोधन पर मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनाही यावेळी मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

हा मेळावा केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी नसून ज्येष्ठांचे पाल्य, त्यांच्या सुना या कौटुंबिक घटकांबरोबरच समाजसेवक, शिक्षक, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या यांनी सहभागी होऊन ज्येष्ठांच्या छळ प्रतिबंधक कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे तसेच प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कासेकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies