उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथं फुलरई गावात एका सत्संग कार्यक्रमावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता १२१ वर पोहोचली आहे. चेंगराचेंगरीत काही जण जखमीही झाले असून त्यांच्यावर हाथरस आणि अलिगढ इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज हाथरस इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल जखमींची विचारपूस केली. योगी आदित्यनाथ आज हाथरस दौऱ्यावर असून त्यांनी सकाळी परिस्थितीचा आढावा घेतला. सत्संग घेणाऱ्या फरार नारायण हरी बाबाचा शोध सुरु आहे. आयोजकांविरुध्द एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.
सत्संग संपल्यावर भाविक तिथून निघताना ही चेंगराचेंगरी झाली. प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी लोकसभेतल्या आपल्या संबोधना दरम्यान या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. पिडितांना शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
केन्द्र आणि राज्य सरकार यांच्याकडून प्रत्येक मृताच्या वारसाला ४ लाख रुपये तर जखमींना १ लाख रुपये आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे.