वाशिमच्या वादग्रस्त सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनानं दिले आहेत. मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीनं दिलेल्या निर्देशानुसार राज्य शासनानं ही कारवाई केली आहे. तसंच त्यांना २३ जुलैपूर्वी मसुरी इथल्या अकादमीत हजर होण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
खाजगी गाडीवर लालदिवा लावणं, प्रोबेशन काळात स्वतंत्र केबिनसाठी आग्रह अशा वर्तनामुळे पूजा खेडकर चर्चेत आल्या. त्यांचं शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्रही वादग्रस्त ठरलं आहे. त्यानंतर केंद्र सरकारनं समिती नेमून त्यांची चौकशी सुरु केली आहे.
दरम्यान, त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करावेत,असे आदेश राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी दिले आहेत. पुण्यातल्या दिव्यांगांनी आंदोलन करून पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी केली होती. या आंदोलनाची राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी दखल घेत, पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे पोलीस आयुक्त यांना याबाबतची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.