डोंबिवली ( शंकर जाधव ) : महापालिका परिक्षेत्रात गेले काही दिवस सातत्याने मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. आज दिवसभरात 109 mm पर्जन्यवृष्टी महापालिका परिक्षेत्रात झाली. या पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, महापालिकेचे अभियंते,सहा आयुक्त सर्व प्रभागात कार्यरत असून महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी देखील महानगरपालिकेच्या इन्टीग्रेटेड कंट्रोल ॲन्ड कमांड सेंटर (ICCC) मधून पावसाळी आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला.
महापालिका परिक्षेत्रात गेले काही दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पडत असून, उल्हास व काळु नदी धोकादायक पातळी जवळ आल्यामुळे नागरीकांनी सावध रहावे आणि महत्वाच्या कामांशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेच्या आपत्कालीन टोल फ्री क्रमांक( अ) पाणी साचणे तसेच ड्रेनेज विषयक तक्रारी - 18002334392, ब) वृक्ष पडणे/आग लागण्याची घटना - 18002337383 व क) धोकादायक इमारत/भुसख्खलन/ रस्त्यावरील खड्डे- 18002330045) यावर संपर्क करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी केले.
महापालिकेच्या 'अ' प्रभागातील सखल भागात आज पाणी साचल्यामुळे येथील सुमारे 100 नागरीकांना शहाड येथील पाटीदार भवन येथे स्थलांतरीत करण्यात आले . तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली.'क' प्रभागात आण्णाभाऊ साठे नगर,रेतीबंदर परिसरात पाणी साचल्यामुळे तेथील नागरीकांसाठी स्थलांतराची यंत्रणा सज्ज ठेवली असून, आवश्यकतेनुसार जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच डॉक्सी गोळ्यांची व ओआरएसएल चे वाटप करण्यात आले.'ड' प्रभागात सावरकर नगर येथे पाणी साचल्यामुळे तेथे सक्शनपाईप लावून पाण्याचा निचरा करण्यात आला, सखल भागात पाणी शिरलेल्या भागातील नागरीकांसाठी जाईबाई शाळा येथे नागरीकांसाठी व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात आली आहे.'जे'प्रभागात अशोकनगर, वालधुनी परिसरातील लोकांसाठी बुध्दविहार तसेच महापालिका शाळा क्र. 16 येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
'आय' प्रभागातील द्वारली येथे साचलेल्या पाण्यात 2 सक्शन पंप लावून निचरा करण्यात येत आहे.'ग' प्रभागात बालाजी गार्डनच्या पाठीमागे असलेल्या चाळीत पाणी भरल्याने तेथील रहिवाशांना महापालिका शाळा क्र. 21 मध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.महापालिकेच्या आरोग्य पथकाने पाटीदार भवन येथील स्थलांतरीत केलेल्या नागरीकांची आरोग्य तपासणी केली, त्यांचे रक्तनमूने घेण्यात आले आणी डॉक्सी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. वालधुणी अशोकनगर परिसरातील उर्दु शाळा परिसर, जगदिश तबेला, शिवाजीनगर येथील होम टॉवर, सातारकर चाळ येथील पुर संभाव्य परिसरात डॉक्सी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. भवानीनगर, धावडेश्वर चाळ, जयदुर्गा व इतर परिसरात डॉक्सी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.