Type Here to Get Search Results !

प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथे जागतिक स्तनपान सप्ताह विषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न







उरण दि १०(विठ्ठल ममताबादे ) : एक ते सात ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह संपूर्ण जगामध्ये साजरा होत असताना उरण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथे एमजीएम जन वैद्यकशास्त्राचे पोषण विभाग तथा एमजीएम मेडिकल कॉलेज वाशी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्तनपान याविषयी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र इटकरे तसेच एमजीएम वाशी येथील वैद्यकीय तज्ञ यांनी तसेच डॉक्टर शिल्पी यांनी स्तनपानाविषयी गरोदर माता व स्तनदा माता यांना स्तनपानाचे महत्त्व व कशा पद्धतीने करावे याबद्दल आलेल्या डॉक्टरांनी मार्गदर्शन केले . नवजात बालकाला सुरुवातीपासूनच स्तनपान करविणे हे त्याच्यासाठी एक नैसर्गिक वरदानच नव्हे तर ते जीवनामृत आहे. त्यामुळे पहिले सहा महिने बाळाला केवळ आईचे दूध देणे गरजेचे असते. ऑगस्ट महिन्यात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने स्थानिक पातळीवर जनजागृती करण्यात येते.पूर्ण स्तनपान केलेली बालके शारीरिक व बौद्ध‍िकदृष्टया तंदुरुस्त असतात. स्तनपानामुळे बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकते हे लक्षात घेऊन बाळाच्या जन्मानंतर मातेचे दूध हे परिपूर्ण अन्न आहे. ते आरोग्यवर्धक, निर्मळ तसेच पचण्यास सोपे असते. वेगवेगळया जंतुसंसर्गापासून मधुमेहापर्यंत आणि डायरियापासून निरनिराळया ॲलर्जीपर्यंत अनेकविध आजारांचा धोका स्तनपानामुळे घटतो.


पोषकतत्व तसेच रोगप्रतिकारक्षमता आणि पचविण्यासाठी सोपे आणि दुधातून पुरेसे पाणीसुद्धा मिळते, अशा सर्व गुणधर्मामुळे सहा महिने आईचे दूध गरचेचे असते. बाळ व आई एकत्र असताना, ते प्रवासात व घराबाहेर कोठेही बाळाला सहज उपलब्ध होते. बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, रुग्णालये असा सार्वजनिक ठिकाणी मातेस स्तनपान करता यावे यासाठी शासानाने “हिरकणी कक्ष” या नावाने स्वतंत्र जागा उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यामुळे स्तनपानाचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येक मातेने आपल्या सुदृढ व सक्षम बालकाच्या विकासासाठी त्याला आवर्जून स्तनपान करावे असे उपस्थित तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.



स्तनपानाचे महत्व जागतिक स्तरावरील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितले असून बालकांना जन्मल्याबरोबर जंतू संसर्गाना सामोरे जावे लागते. त्यावर आळा घालण्यासाठी बाळ जन्मल्यावर शक्य होईल तितक्या लवकर म्हणजेच अर्ध्या तासाच्या आत मातेने बाळास स्तनपान दिल्यास कोलेस्ट्रमयुक्त दूध बालकास मिळते. त्यामुळे बालकाची रोगप्रतिकारशक्ती व्दिगुणीत होते. बाळाला स्तनपान देण्यास काही अडचण असेल तर मातेने प्रशिक्षित आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका आणि नजीकच्या आरोग्य संस्थेत जाऊन सल्ला घ्यावा तसेच घरातील जवळच्या व्यक्तीही अशा मातेस मदत करू शकतात. त्या अनुषंगाने ऑगस्ट महिन्यातील जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त प्रत्येक मातेने आपल्या बाळाच्या आऱोग्याची काळजी घेत स्तनपानाचे महत्व लक्षात घेऊन सुरुवातीचे सहा महिने निव्वळ स्तनपान दयावे तसेच बाळ दोन वर्षाचे होईपर्यंत पूरक आहारासोबत स्तनपान देखील सुरू ठेवावे असे आवाहन डॉक्टर राजेंद्र इटकरे तालुका आरोग्य अधिकारी उरण यांनी जमलेल्या गरोदर आणि स्तनदा माता यांना केल्यानंतर कार्यक्रमाचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies