बदलापूर : बदलापूरातील अल्पवयीन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची आज पोलीस कोठडी संपल्यानं त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बदलापूरमधील एका नामांकित आदर्श विद्यामंदिर शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच चार दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेतील एक चिमुकली तीन वर्षे आठ महिन्यांची आहे. तर दुसरी चिमुकली ही सहा वर्षांची आहे. हा धक्कादायक प्रकार उजेडात येताच जमाव मोठ्या प्रमाणात संतप्त झाला. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. असं असताना आरोपीला १७ ऑगस्ट रोजी अटक करुन त्याला न्यायालयात हजर केलं असता, त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र आज कोठडी संपल्याने पुन्हा त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी अक्षय शिदेंला हजर केलं असता न्यायालयाने त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी.ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी युक्तीवाद केला.
कल्याण जिल्हा न्यायालयात केलं हजरबदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण जिल्हा न्यायालयात हजर करण्यापूर्वी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आरोपीला फाशी द्या अशी मागणी बदलापूरकरांकडून केली जात होती. बदलापुरातील पालक आणि नागरिकांचा रोष पाहता आरोपीवर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे कायदा सुव्यवस्था पाहता पोलीसांनी स्टेशन परिसरासह कल्याण न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.