Type Here to Get Search Results !

ख्यातनाम शिल्पकार कै. सदाशिव साठे यांनी साकारलेल्या शिल्पाकृतींचे मुंबईत शिल्प प्रदर्शन



नेहरू सेंटर, वरळी येथे १४ ते १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रदर्शन असणार सर्वांसाठी खुले!

मुंबई - कल्याणकरांच्या मांदियाळीत मानाचे स्थान स्वत:च्या अंगी असलेल्या उत्स्फूर्त कलेने व त्याला अतीव परिश्रमांची जोड देत फक्त देशात नव्हे तर जगप्रसिद्ध ख्याती मिळवलेले कल्याणचे कै. सदाशिव ऊर्फ भाऊ साठे यांनी साकारलेल्या शिल्पकलांच्या प्रदर्शनाचे आयोजन पहिल्यांदाच मुंबईतील नेहरू सेंटर, हॉल ऑफ हार्मनी, वरळी येथे १४ ऑगस्ट २०२४ ते १९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून सर्व शिल्प कलाकारांसाठी तसेच कला क्षेत्राची आवड असलेल्या सर्व वयोगटातील प्रत्येक व्यक्तीसाठी ही पर्वणीच आहे.

गेट वे ऑफ इंडियाच्या समोरचा अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा, ग्वाल्हेर येथील झांशीच्या राणीचा पुतळा, दिल्लीत लाल किल्ल्यासमोरच्या उद्यानात नेताजी बोस यांचे बंदूकधारी सैनिकांसह आक्रमक पवित्र्यातील समूहशिल्प, आसाम गुवाहाटी येथे गांधीचं शिल्प, चंदीगड येथे येशू ख्रिस्त, पंजाबात क्रांतिकारकांची शिल्पे, शिवस्मारके, यशवंतराव चव्हाण, जयप्रकाश नारायण, राधाकृष्णन, अटलबिहारी वाजपेयी अशा बऱ्याच महारथींची आणि अनेक प्रख्यात शिल्पे ज्यांनी साकारली त्या सदाशिव साठे यांचं कार्य आत्ताच्या पिढीपर्यंत पोचून त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेलं असल्याचे सदाशिव साठे यांचे सुपुत्र श्रीरंग साठे यांनी सांगितले.

सदाशिव साठे स्मृती संग्रहालय आणि ग्रंथाली यांच्या तर्फे शिल्पगंधर्व सदाशिव साठे यांच्या ‘हा ध्यास जीवनाचा’ या आत्मकथनाचा पुस्तक प्रकाशन सोहळा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. या आत्मकथनाचे सहलेखन- शब्दांकन सतीश कान्हेरे यांनी केले आहे. चित्रकार व कला अभ्यासक माननीय सुहास बहुळकर आणि चित्रपट निर्माते व दिग्दर्शक माननीय रवी जाधव हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी असणार आहे. या शिल्प प्रदर्शनाला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी असे आवाहन श्रीरंग साठे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies