ठाणे ( विनोद वास्कर ) - १३ ऑगस्ट पासून ठाणे मनोरूग्णालयासमोर सफाई कामगारांनी साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे.दुपारी १ वाजता उपसंचालक आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली रूग्णालय प्रशासनाने मिटींग बोलावली होती.मात्र उपसंचालक यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी ठेकेदार यांनी ठोस भूमिका घेतली नसल्याने दुसऱ्या दिवशी देखील साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे कामगार नेते श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी सांगितले.
कोर्टाने किमान वेतन अधिनियम १९४८ नुसार वेतन अदा करण्याचे आदेश दिले असताना रूग्णालय प्रशासन आणि ठेकेदार जबाबदारी पार पाडण्यासाठी ठोस भूमिका घेत नाही पाच वर्षे कामगारांना दर सहा महिन्यांनी वाढणारी महागाई भत्याची रक्कम वेतनात अदा न केलेली थकीत रक्कम अदा करा, कोर्टाचे आदेशानुसार किमान वेतन अदा करा,सफाई कामगारांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्या; वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम अदा करा.कोर्टाचे आदेशानुसार राजबीर चौहानला कामावर हजर करून घ्यावे,आदी विविध मागण्यासाठी आज सकाळी ९ वाजल्यापासून साखळी उपोषणाची सुरूवात मनोरूग्णालयासमोर सुरूवात झाली.
सफाई कामगार दीनानाथ देसले,अनिता कुमावत, शर्मिला लोगडे आणि संजय सेंदाणे यांनी २४ तासांसाठी उपोषण सुरू केले.उपसंचालक यांच्या दालनात झालेल्या बैठकीत उपसंचालक डॉ.नंदापुरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक,उपसंचालक कार्यालय सी.ओ.पाटणकर, मनोरूग्णालय सी.ओ. लांजेवार,प्रशासकीय अधिकारी डॉ. रानडे, कामगारांतर्फे श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया,कामगार प्रतिनिधी सोनी चौहान,संजय सेंदाणे, किशोर शिराळ,महेश निचिते,नंदकुमार गोतारणे आणि सफाई कर्मचारी उपस्थित होते.कंत्राटदार विजय कांबळे स्वतः उपस्थित न राहता त्यांनी मुलगा प्रतिक कांबळे यांना पाठवले होते. रूग्णालय प्रशासन मुळ मालक म्हणून कायदेशीर जबाबदारी स्वीकारून कामगारांना न्याय देत नाही आणि ठेकेदार प्रशासनाचे आदेश पाळायला तयार नसल्याने ठोस तोडगा निघू शकला नाही.
सफाई कामगारांच्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ''घर बचाओ घर बनाओ'' आंदोलनचे नंदू शिंदे, पुजा पंडित,समता विचार प्रसारक संस्थेच्या हर्षलता कदम,मिनल उत्तूरकर,सुनील दिवेकर, ॲड.साहिल गायकवाड, अजय भोसले, आरपीआय कसारा विभागाचे देविदास भोईर,महापालिका कर्मचारी संघटनेचे किरण कांबळे बहुजन विकास संघाचे दिलीप चौहान,श्रमिक जनता संघाचे कार्यकर्ते आणि ठाणे महानगरपालिकेतील कामगार आणि डॉ.भिमराव जाधव आदी विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून कामगारांच्या न्याय मागण्यासाठी पाठिंबा दिला आहे..