डोंबिवली ( शंकर जाधव ) : काटई गावचे सामाजिक कार्यकर्ते गजानन जयवंत पाटील यांच्या घरगुती गणेशोत्सवात गणपती बाप्पा शैक्षणिक साहित्यिक विराजमान झाले आहेत. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात या शैक्षणिक साहित्याचा चांगला उपयोग होईल असा संकल्प पाटील यांचा आहे. गेली ४५ वर्षे त्यांच्या घरी घरगुती गणेशोत्सव साजरा होत असून मागील नऊ वर्षांपासून पाटील असे विविध उपक्रम हाती घेत आहेत.यंदाच्या दहाव्या वर्षी त्यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येणारे भक्त हाल-फुले न आणता केवळ शैक्षणिक साहित्य देवाला अर्पण करीत आहेत.गणेशोत्सवात जमलेले शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील, आदिवासी पाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.
काटई गावचे गजानन पाटील सामाजिक कार्यात सातत्याने भाग घेत असतात. गणेशोत्सव काळात सुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून एखादा उपक्रम करता येईल म्हणून त्यांनी मागील ०९ वर्षांपासून त्यांच्या राहत्या घरी गणेशोत्सव काळात गणेश भक्तांकडून शैक्षणिक साहित्य संकलित करण्याचे आव्हान केले. या आवाहनाला गणेश भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याने मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक साहित्य जमा होऊ लागले आहे. गणपतीचे मखर सजावटीकरिता सुद्धा शैक्षणिक साहित्यांचाच वापर केला आहे. बखरीतील हे शैक्षणिक साहित्य गणेश मूर्ती विसर्जनानंतर जसेच्या तसे काढून गरीब गरजू विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात येते. या उद्देशामुळे या शैक्षणिक साहित्यांमध्ये आणखीन भर पडली.
गणेशोत्सवात जमलेले शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील, आदिवासी पाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाते. या उपक्रमात अशी शाळा निवडतात की तेथील विद्यार्थ्यांना खरोखर अशा शैक्षणिक साहित्याची गरज आहे. उत्सवानंतर मोठ्या प्रमाणावर जमलेले शैक्षणिक साहित्य आदिवासी पाड्यातील एखाद्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्षभराचे शैक्षणिक साहित्यांची गरज पूर्ण होते. पाटील यांच्या या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळत आहे. त्यांचे काही मित्रपरिवार सुद्धा अशा प्रकारे गणेशोत्सव काळातील उपक्रम राबवत आहेत. या सामाजिक कार्याबद्दल लोकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.