डोंबिवली ( शंकर जाधव ) जेएम एफ संस्थेच्या ब्रम्हा रंगतालय मध्ये जनगणमन विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज आठवा स्नेहसंमेलन कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा झाला. कार्यक्रमात जवळजवळ 125 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात गायन, वादन, नाटक,सामूहिक नृत्य, महाराष्ट्राची संस्कृती आणि फॅशन शो अशा भरघोस कार्यक्रमांचा समावेश होता. प्रेक्षकांचाही प्रचंड प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विष्णूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार , रेगे दिक्षित सायन्स अकॅडमीचे शैलेश रेगे , स्टडी बझ अकॅडमीचे कैलास चव्हाण ,भोजराज उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नटराज व सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने होऊन स्वागत गीत व गणेश वंदन सादर करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे सचिव व प्राचार्या डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे कोषाध्यक्षा जाह्णवी राजकुमार कोल्हे. प्रभारी प्राचार्य अल्पेश खोब्रागडे सर उपप्राचार्य एकनाथ चौधरी विद्यामंदिरचे प्रभारी मुख्याध्यापक अमोद वैद्य उपमुख्याध्यापिका तेजावती कोटियन आणि संपूर्ण शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
डॉ.प्रेरणा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले की, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये करिअर खूप महत्त्वाचे आहे. शिक्षण घेत असतांना आपल्या करिअर कडे लक्ष देणे गरजेचे आहे.डॉ.राजकुमार कोल्हे यांनी सांगितले की, आयुष्याचा आनंद घेतांना आपली कर्तव्य लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. आकांक्षांची उंची गाठायची असेल तर नेहमी मेहनत करण्याची तयारी पाहिजे.
व पो नि.संजय पवार यांनीही विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन केले. विशेष बाब म्हणजे कल्याण डोंबिवली जिल्हा स्तरावर प्रविण्य मिळविणारे कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू मानसी बोन्डे- बुद्धिबळ तृतीय, अथर्व सोनार-धावणे, लांब उडी द्वितीय आणि रिले प्रथम, रोहण नाईक-लांब उडी तृतीय, रिले प्रथम,श्रवण सोहनी रिले प्रथम, यश उपासणी रिले प्रथम, अनमोल मेस्त्री रिले प्रथम, गिरीश पवार कॅरम प्रथम, आयुष घाडी कॅरम सहावा आणि ध्रुव शिरसाठ तलवारबाजी मध्ये द्वितीय यांचा सत्कार करण्यात आला. शुभम सनिता आणि रुपाली निषाद हे 2024-25 चे उत्कृष्ट विद्यार्थी म्हणजेच मिस्टर आणि मिस जन गण मन ज्युनिअर कॉलेज आणि उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्मित चव्हाण व शिरिया गुप्ता यांना सन्मानित करण्यात आले.
आभार प्रदर्शन निहारिका डायस यांनी व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन्जल उपाध्याय व सान्वी वालणकर या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतल्याचे दिसून आले.कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली.