ठाणे :- अपर पोलीस महासांचालक व महानिरीक्षक कारागृह वसुधारसेवा व महाराष्ट्र राज्य, पुणे श्री.प्रशांत बुरडे (भा.पो.से) यांच्या संकल्पनेतून व कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग श्री.योगेश देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (MRSETI) ठाणे व विभागीय कार्यालय बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे यांच्या संयुक्त विद्यामाने कारागृहातील बंदी मुक्त झाल्यावर रोजगार उपलब्ध होईल व पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाही, याकरिता खुले कारागृहातील शिक्षा बंद्यांसाठी दि.17 डिसेंबर 2024 रोजी आयोजित “मशरूम लागवड व गांडूळ खत निर्मिती”प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्रीमती राणी भोसले व जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक श्री.अभिषेक पवार यांच्या हस्ते पार पडले.
या प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटनाकरिता अतिरिक्त अधीक्षक श्री.राजाराम भोसले, महाबँक MRSETI, ठाणे संचालक श्री. आशीष लोहकरे व वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री.के.पी.भवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अल्का देवरे (विषयतज्ञ) यांनी केले. जिल्हा अग्रणी बँक प्रमुख जिल्हा व्यवस्थापक श्री.अभिषेक पवार यांनी मशरूम लागवड व गांडूळ खत निर्मितीबाबत उपस्थित बंद्यांना प्रशिक्षणाची सविस्तर माहिती देवून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या बंदीना कारागृहातून मुक्त झाल्यानंतर महाराष्ट्र बँकेकडून स्वयंरोजगाररकरिता देण्यात येणाऱ्या कर्जाबाबत माहिती दिली.
त्याचप्रमाणे कारागृह अधीक्षक श्रीमती राणी भोसले यांनी बंदींकरिता सुरु करण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये जास्तीत जास्त बंद्यांनी सहभाग घेवून यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच कारागृहातून मुक्त झाल्यावर स्वयांरोजगाराकरिता बंद्यांकरिता महाराष्ट्र बँकेकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
हे प्रशिक्षण कारागृहाच्या शेती विभागात पार पाडणार असून मशरूम लागवड व गांढूळ खत निर्मिती या व्यावसायिक प्रशिक्षणाकरिता प्रथम बॅचमध्ये एकूण– 35 बंद्यांनी सहभाग घेतला असून MRSETI, ठाणे यांच्याद्वारे नियुक्त प्रशिक्षकाद्वारे सहा दिवसांचे प्रशिक्षण देवून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या बंद्यांना कौशल्य विकास विभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे महाबँक आरसेटी, ठाणे संचालक आशिष लोहकरे यांनी कळविले आहे.