ठाणे :- दि.07 फेब्रुवारी 1986 रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापन दिनानिमित्ताने पूर्वनियोजन व इतर विषयांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीकरिता महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार श्री.ग.दि. कुलथे यांची विशेष उपस्थिती लाभली तर त्यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीचे नवनियुक्त अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, कोकण विभागाचे सहसचिव डॉ.अविनाश भागवत, सरचिटणीस तथा जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप, राज्य कार्यकारिणीचे श्री.रमेश जंजाळ, श्री.सुदाम टाव्हरे, श्री.दिगंबर सिरामे, श्री.बापूसाहेब सोनवणे, श्री.सिदप्पा बोरकडे, श्री.मोहन पवार, डॉ.नितीन मुळीक, डॉ.तरुलता धनके व विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत महासंघाच्या कल्याण केंद्र इमारत बांधकाम निधी संकलनाची प्रगती, महासंघाचे कार्यसंस्कृती अभियान, पगारात भागवा अभियानाची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी, जिल्हा समन्वय समितीचे पुनर्गठन आदी विषयांवर चर्चा झाली.
यावेळी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार श्री.ग.दि. कुलथे यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. तर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष श्री.विनोद देसाई, सरचिटणीस श्री.समीर भाटकर यांनी महासंघाच्या पुढील वाटचालीविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तर ठाणे जिल्हा समन्वय समितीचे नवनियुक्त अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांनी आगामी काळात जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या एकत्रित समन्वयातून ठाणे जिल्हा समन्वय समिती उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते “पगारात भागवा” अभियानाच्या घडीपत्रिकेचे प्रकाशनही करण्यात आले. “संकल्प कार्यसंस्कृतीचा.. ध्यास राज्याच्या विकासाचा” हे या अभियानाचे ब्रीदवाक्य आहे. यानुसार संपूर्ण राज्यभर हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार श्री.ग.दि. कुलथे यांनी सांगितले.