ठाणे,दि.03 :- अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी आज शहापूर तालुक्यातील तहसिलदार कार्यालय, तलाठी कार्यालय, ॲग्रीस्टॅक शिबिर, आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा इत्यादी ठिकाणी भेटी देवून तेथील आढावा घेतला.
या दौऱ्यात त्यांनी तहसिलदार कार्यालयाला भेट देवून शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने कार्यालय परिसराची पाहणी केली व बैठक घेवून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच त्यांनी वाशिंद तलाठी कार्यालय व मंडळ कार्यालय येथे दप्तर तपासणी केली व वाशिंद येथील जिल्हा परिषद शाळेत भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांसोबत हितगुज केला. त्याचप्रमाणे वाशिंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देवून तेथील ओपीडी, लॅबला भेट देवून तेथील कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये-धुळे यांनी दहागाव येथील ॲग्रीस्टॅक शिबिराला भेट देवून शेतकऱ्यांसोबत त्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला, त्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या या कृतीने प्रभावित होवून शेतकऱ्यांनी त्यांना फळभाज्या भेट म्हणून दिल्या.
यावेळी शहापूर तहसिलदार परमेश्वर कासुळे, तलाठी, मंडळ अधिकारी, वाशिंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक-विद्यार्थी व शेतकरी उपस्थित होते.