Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

हिवताप, डेंग्यू, साथरोग विषयक जाहीर जनजागृती शिबिरांचा नागरिकांनी घेतला लाभ



नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप / डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रांतर्गत पावसाळा कालावधीत प्रत्येक आठवड्याला एक दिवस विशेष हिवताप / डेंग्यू जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. शिबिरांना भेटी दिलेल्या नागरिकांमध्ये हिवताप / डेंग्यू व साथरोगाबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली.

येणारा पावसाळा कालावधी लक्षात घेता दिनांक 16 ते 21 मे 2025 या कालावधीत 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात वैद्यकिय अधिकारी यांचेमार्फत कार्यक्षेत्रातील खाजगी वैद्यकिय व्यावसायिक व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सर्व कर्मचाऱ्यांची सभा घेण्यात आली. या सभेमध्ये खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांनाही पाचारण करून हिवताप / डेंग्यू नियंत्रणाबाबत बनविलेली ध्वनीचित्रफित दाखवण्यात आली. हिवताप / डेंग्यू, साथरोग अशा आजाराचे रुग्ण महानगरपालिकेस तात्काळ कळविण्याबाबत सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील सर्व कर्मचाऱ्यांना पावसाळा कालावधीमध्ये सतर्क राहण्याबाबत सूचित करण्यात आले.

याप्रमाणे नमुंमपा कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचून जनजागृती करण्याकरिता दि. 22 मे 2025 रोजी 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विविध ठिकाणी जाहीर शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरांमध्ये 10,021 नागरिकांनी भेट दिली असून, 647 रक्तनमुने घेण्यात आले आहेत.

सदर शिबिरांचे वैशिष्टय म्हणजे यामध्ये ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या आळ्या प्रत्यक्ष दाखवून तसेच पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्याबरोबरच घराभोवती व घरांतर्गत असणा-या डासोत्पत्ती स्थानांची माहिती करून देणे, पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे तसेच आठवड्यातून एक दिवस त्या स्वच्छ करुन कोरड्या ठेवणे, भंगार साहित्य व टायर्स इ. नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शिट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे व ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे, त्याचप्रमाणे घर व परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी उकळून पिणे, भाजीपाला स्वच्छ धुवून वापरणे, उघडयावरचे अन्न खाणे टाळणे याबाबत नागरीकांना अवगत करुन आवाहन करण्यात आले.

आरोग्य विभागाच्या अशा कार्यवाहीसोबतच नवी मुंबईकर नागरिकांनी घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणे तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आजुबाजूचा परिसर / टेरेसवरील भंगार नष्ट करणे आदी बाबींवर लक्ष दिले तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल. तरी सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी यामध्ये संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


Design by - Blogger Templates |