दिवा:- दिवा विभागातील नागरिक सध्या वारंवार होणाऱ्या टोरेंट पॉवरकडून वीजपुरवठा खंडिततेमुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दिवसातून अनेक वेळा वीज खंडित होत असल्यामुळे घरगुती कामकाज, पाणीपुरवठा, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन काम, दुकानदार व लहान व्यावसायिकांचे व्यवहार ठप्प होत आहेत.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रायव्हेट वीज वितरण कंपनीकडून याबाबत ठोस उपाययोजना झालेली नाही. परिणामी लोकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. यामुळे फ्रीज, पंखे, टीव्ही, वॉशिंग मशीन यासारख्या महागड्या उपकरणांचे नुकसान होत आहे. तसेच रुग्णालये, शाळा, ऑफिस यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणीही या समस्येचा परिणाम जाणवतो आहे.
स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि व्यापाऱ्यांकडून संबंधित कंपनीला तातडीने पुढाकार घेऊन दोष दूर करावा, तांत्रिक दुरुस्ती करावी, आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. जर तातडीने लक्ष दिले गेले नाही, तर नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संपूर्ण विभागातील नागरिकांची ही समस्या गंभीर असून, प्रशासनानेही लक्ष घालून वीज वितरण कंपनीला कठोर सूचना द्याव्यात, अशी मागणी कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे निवेदन देताना यावेळी दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील युवा सेना शहर अधिकारी अभिषेक ठाकूर उपशहर संघटक प्रवीण उतेकर विभाग प्रमुख राज रसाळ उपविभाग प्रमुख संदीप राऊत गजानन शेलार टोरेंट पॉवर कंपनीचे अधिकारी श्री.पांचाल श्री.संघषण खोब्रागडे उपस्थित होते