अंबरनाथ दि. ०९ ( नवाज वणू ) : अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष, लोकनेते गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर १७२ वर्षांचा आयुर्वेद युनानी अनुभवी असणारी हैदराबाद आयुर्वेद संस्था आणि गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या वतीने भाजपा अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजीत करंजुले पाटील व भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुले पाटील यांच्या संकल्पनेतून अंबरनाथमध्ये ८ जून २०२५ रोजी आयोजित 'मोफत अस्थमा ट्रीटमेंट कॅम्प' शिबिराला केवळ राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून देखील अस्थमाच्या विविध आजारांवर आयुर्वेद उपचारासाठी हजारोच्या संख्येने लोकांनी रांगेत उभे राहून या शिबिराचा लाभ घेतला. मागील ७ वर्षात ३४ हजार ७०० रुग्णांनी लाभ घेतला. तर यंदा ८ व्या वर्षी जवळपास ७ हजार ५०० रुग्णांनी लाभ घेतल्याचे आयोजक अभिजीत करंजुले पाटील यांनी सांगितले.
गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांच्याहस्ते दीप प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराज व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून 'अस्थमा ट्रीटमेंट कॅम्प'चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दम्यावर उपचार करणारे औषध माशाच्या तोंडातून आणि केळीतून दिलं जातं. हे जगप्रसिद्ध असलेले औषध हैदराबाद येथे दिले जाते. त्या ठिकाणी जायचा खर्च आणि वेळेअभावी सर्वांनाच शक्य नाही. त्यांची गैरसोय पाहून हैदराबाद येथील पथकाला अंबरनाथमध्ये आणून रुग्णांची सेवा करण्याचा मनोदय ठेवला आहे. दमेकरी हे इतके त्रासलेले असतात की, त्यांना त्या औषधीचा फायदा होतो. दम्याचा विकार हा मासा जसा पाण्याबाहेर तडफडतो... तसा हा दम्याचा आजार आहे. हे औषध इतके गुणकारी आहे, त्याचा बऱ्याच लोकांना फायदा मिळालेला आहे. ते फोन करून आमच्या प्रतिष्ठानचे अभिनंदन करत असतात. या आयुर्वेदिक औषधाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ घ्यावा असा मनोदय 'अस्थमा ट्रीटमेंट कॅम' च्या उद्घाटन प्रसंगी गुलाबराव करंजुले पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुले पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले, भाजप पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजीत करंजुले पाटील, पश्चिम मंडळ अध्यक्ष लक्ष्मण पंत, विधानसभा महिला संयोजिका रोझलीन फर्नांडिस, अंबरनाथ व्यापारी संघाचे अध्यक्ष खानजी धल, भाजपचे सरचिटणीस दिलीप कणसे, सरचिटणीस व्ही तंगराज नाडार, कार्तिक आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी हैदराबाद येथील आयुर्वेदिक औषध देणाऱ्या पथकाला सहकार्य केले. या दमा शिबिराचे सूत्रसंचालन भाजपा जिल्हा सरचिटणीस दिलीप कणसे यांनी केले.
गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान तसेच भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी, स्वयंसेवक यांच्या एकजुटीने अंबरनाथमध्ये सलग आठव्या वर्षी 'मोफत अस्थमा ट्रीटमेंट कॅम्प' राबवण्यात आले. वातानुकूलित स्वानंद हॉलमध्ये शिस्तबद्ध आणि रांगेतून आलेल्या नागरिकांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी व ज्येष्ठ नागरिक अशा तीन विभागात व्यवस्थापन करण्यात आले होते.