मनसे नेते अविनाश जाधव यांच्या सोबत घेतली शिक्षण अधिकाऱ्यांची भेट
ठाणे : महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकविण्यासंदर्भात आदेश निर्गमित केला होता. सदर निर्णयाला मनसे कडून तीव्र विरोध झाल्यानंतर हा आदेश रद्दबातल ठरविण्यात आला होता. पण तरीही दिव्यातील शाळांमध्ये आजही हिंदी भाषा शिकवली जात असल्याची लेखी तक्रार काही पालकांनी दिवा मनसे कडे केली होती.
यासंदर्भात दिवा मनसेच्या शिष्टमंडळाने मनसे नेते अविनाश जाधव यांच्या सोबत शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन अशा शाळांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. तसेच ठाणे शहरातील सर्व शाळांना याबाबतचे लेखी आदेश शिक्षण विभागाने जारी करावेत अशी सूचना अविनाश जाधव यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना केली.
पुढील २४ तासात याबाबतचे स्पष्ट आदेश सर्व संबंधित शाळांना काढू असे आश्वासन शिक्षण अधिकाऱ्यांकडून मनसेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले. यावेळी मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, शहर सचिव प्रशांत गावडे, उपशहर अध्यक्ष मोतीराम दळवी, मनविसे शहर अध्यक्ष कुशाल पाटील, विभाग अध्यक्ष देवेंद्र भगत, प्रकाश पाटील, शरद पाटील, किरण दळवी हे पदाधिकारी उपस्थित होते.