ठाणे : ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका झोमॅटो डिलव्हरी करणाऱ्या तरुणाकडून तब्बल तीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. तर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीकडून ९२ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.
या कारवाईमुळे साधी कामे करणाऱ्या या दोन्ही तस्करांची काळी कृत्य उघड झाली आहेत. त्यांनी किती जणांनी अमली पदार्थ विकले आणि हे अमली पदार्थ कोणाकडून आणले याचा तपास पोलिस करत आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस हवालदार हरिश तावडे यांना माहिती मिळाली होती की, एकजण शिळफाटा भागात अमली पदार्थ घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा लावून शिळफाटा येथील दिवा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर इरफान शेख (३६) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १ किलो ५२२ ग्रॅम वजनाचा एमडी हा अमली पदार्थ आढळून आला.
याप्रकरणी शिळडायघर पोलिसांनी त्याला अटक केली.इरफान हा पनवेलमध्ये राहणारा असून तो झोमॅटोमध्ये फुड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल मस्के, साहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावीत, सोमनाथ कर्णवर-पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र निकम, नितीन भोसले, दिपक डुम्मलवाड,व पथकाने केली.तर दुसऱ्या कारवाईत खारेगाव टोलनाका भागात एकजण अमली पदार्थ घेऊन येत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकला मिळाली होती. या माहितीनंतर २४ जुलैला पोलिसांनी सापळा लावून एक संशयित कार थांबवली. त्या कारची झडती घेतली असता, कारमध्ये ९२ लाख ६८ हजार रुपयांचे एमडी आढळून आले.
ही कारवाई युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड, साहाय्यक पोलिस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ, उपनिरीक्षक निलम जाधव, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद नाईक,व पथकाने केली.