मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी येथील जय जवान गोविंदा पथक यंदाच्या दहीहंडी सणात नवा इतिहास घडविण्यास सज्ज आहे. पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे, ज्यांनी आपल्या नेतृत्वाखाली अनेक अवघड मानवी पिरॅमिड्स उभारून विक्रम केले आहेत, यांची नुकतीच दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच विजय तांडेल यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली असून या दोघांच्या नेतृत्वाखाली दहीहंडी सणात भव्य कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
संदीप ढवळे यांनी आतापर्यंत अनेक वेळा नऊ थराचा विक्रम केला आहे, मात्र यावर्षी जय जवान पथक दहा थर लावून जागतिक विक्रम करण्याच्या तयारीत आहे. ढवळे म्हणाले, “हा फक्त विक्रमाचा प्रयत्न नाही, हा समाजासाठी एकतेचा संदेश आहे. जय जवान पथक नेहमीच संकट काळात पुढे आले आहे आणि पुढेही समाजासाठी काम करेल.”
जय जवान गोविंदा पथकाने यापूर्वी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे. त्यांच्या शिस्तबद्ध सराव, जिद्द आणि प्रशिक्षक संदीप ढवळे यांचे नेतृत्व हेच त्यांच्या यशामागचे गमक आहे.
दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि आराध्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "ग्रो गोविंदा पर्व 2" या भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय क्रीडा मंदिर, नायगाव क्रॉस रोड, वडाळा (मुंबई) येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि आराध्या फाउंडेशनतर्फे होणार आहे.
अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर संदीप ढवळे यांनी दहीहंडी उत्सव अधिक व्यापक, सुरक्षित आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी दिशा ठरवली. माजी अध्यक्ष अरुण पाटील यांनी स्वेच्छेने आपला कार्यभार सोपवत असोसिएशनमध्येच मुख्य सल्लागार पद स्वीकारले आहे.
तसेच कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विजय तांडेल यांनी सांगितले, “दहीहंडी क्षेत्रात काम करण्याची माझी मनापासून आवड आहे. या पदाच्या माध्यमातून मला मोठ्या प्रमाणात आणि प्रभावीपणे काम करण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे.”
या वेळी असोसिएशनचे मुख्य सल्लागार श्री अरुण पाटील
श्री संदीप ढवळे अध्यक्ष
श्री विजय तांडेल कार्याध्यक्ष
श्री कमलेश भोईर सचिव
श्री समीर पेंढारे उपाध्यक्ष
श्री विजय निकम उपाध्यक्ष
श्री रोहिदास मुंडे उपाध्यक्ष
श्री संदीप पाटील उपाध्यक्ष
श्री अतुल माने उपाध्यक्ष
श्री राकेश यादव उपाध्यक्ष
श्री राहुल पवार सहसचिव
श्री किरण जामखांडीकर सहसचिव
श्री गौरव शर्मा सल्लागार
श्री निलेश वैती खजिनदार
श्री दशरथ डांगरे सहखजिनदार
श्री अजित यादव सह खजिनदार
श्री दत्ता माने प्रसिद्धीप्रमुख
श्री अमित आंग्रे सभासद
सौ हर्षाली राणे महिला सभासद
सौ श्रेया देवकुळे महिला सभासद
सौ प्रणिता तांबे महिला सभासद
श्री अतुल वटकर सभासद
श्री सचिन खारकर सभासद
श्री आशिष दळवी सभासद व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत, सामाजिक एकात्मता आणि नवउत्साह यांचा संगम असलेला हा दहीहंडी महोत्सव निश्चितच संस्मरणीय ठरणार आहे. दहीहंडीप्रेमींनी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.