ठाणे,दि.13 :- सणासुदीच्या काळात नागरिकांना निर्भेळ, सकस आणि आरोग्यदायी अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन, ठाणे विभागातर्फे एक विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या सूचनेनुसार ही मोहीम 11 ते 18 ऑगस्ट या कालावधीत तसेच प्रत्येक महिन्यामध्येही सुरू राहणार आहे.
ग्राहक संरक्षण कायद्यातील 'ग्राहकांच्या सुरक्षिततेचा हक्क' अबाधित राहावा, या उद्देशाने ही मोहीम राबवली जात आहे. ग्राहक देत असलेल्या पैशांच्या मोबदल्यात त्यांना दूषित अन्नपदार्थांमुळे आरोग्याला कोणताही धोका होऊ नये, यासाठी प्रशासन तत्पर आहे, असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या मोहिमेत मिठाई बनविण्यासाठी लागणारे दूध, मावा, तेल, मैदा, तूप अशा कच्च्या मालाची तपासणी केली जाईल. तसेच, मिठाई तयार करण्यासाठी वापरली जाणारी भांडी, किचनची स्वच्छता आणि कारागिरांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. जुना किंवा शिळा मावा वापरला जाणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जाईल. या तपासणीत जर काही त्रुटी आढळल्यास संबंधित आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 आणि नियम 2011 नुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
अन्न व औषध प्रशासन, ठाणे विभागाचे सह आयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्राहक संरक्षण संस्थेचे गजानन पाटील यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आयुक्त, सह आयुक्त, सहाय्यक आयुक्त, अन्न सुरक्षा अधिकारी, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त यांचे सहकार्य घेतले जात आहे.
या संदर्भात सह आयुक्त श्रीकांत करकाळे म्हणाले की, मिठाई दुकानदाराने मिठाई तसेच तत्सम पदार्थ बनविताना तसेच विकताना सदैव तत्पर असले पाहिजे. लोकांच्या आरोग्याविषयी कुठल्याही प्रकारची निष्कळजी सहन केली जाणार नाही. तसेच दोषी आढळल्यास संबंधित पेढीवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
ग्राहक संरक्षण संस्था ठाणेचे श्री. गजानन के. पाटील म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायद्यातील पहिलाच "ग्राहक सुरक्षिततेचा हक्क" यामध्ये ग्राहक देत असलेल्या पैशाच्या मोबदल्यात दूषित अन्न पदार्थामुळे आरोग्याला बाधा येऊ नये, तसेच निर्भेळ व सकस अन्न ग्राहकाला मिळावे यासाठी अन्न व औषध प्रसासन, ठाणे विभागाकडून अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.