नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रास सर्व प्रकारच्या शेतपिकांसाठी उपयुक्त अशा द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्ये खताच्या उत्पादनाचा परवाना प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून त्यास 'यश मायक्रो ग्रेड-II' असे नाव मंजूर झालेले आहे. या परवान्यामुळे विद्यापीठाला शेतकऱ्यांसाठी उपयुक्त उत्पादने व सेवा विकसित करण्यास मदत होणार आहे. सदर फवारणी खत उत्पादन प्रायोगिक तत्वावर वापरण्यासाठी लवकरच उपलब्ध होईल. यामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विद्यापीठात कृषी विज्ञान केंद्राची माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी माती आणि पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करून त्यांना जमीन व पाण्याच्या आरोग्याविषयी नियमित मार्गदर्शन केले जाते. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली याच प्रयोगशाळेद्वारे शेतकऱ्यांना पीक उत्पादनात वाढ होण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने या द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांची निर्मिती करण्याचे निश्चित करण्यात आले. दीड वर्षे याविषयी रीतसर कार्य - प्रक्रिया सुरु होती. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेमधील संयंत्रांमध्ये आवश्यक बदल व सुधारणा करून ती कार्यान्वित करण्यात आली. संबंधित द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्ये खताच्या नमुन्याची विद्यापीठ व शासनाच्या प्रयोगशाळेत रीतसर मानकानुसार चाचणी घेण्यात आली. या दोन्ही चाचण्यात हे द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्ये खत पात्र ठरले. ही प्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या कृषी विभागाने विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राला द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांच्या उत्पादनासाठी अधिकृत परवाना प्रदान केला आहे.
यासाठी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. नितीन ठोके यांच्या पुढाकाराने प्रयोगशाळा कार्यक्रम सहाय्यक (कृषी) श्री. मंगेश व्यवहारे यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला. राहुरीच्या महात्मा कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त मृदा शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे यांची यासाठी बहुमोल मदत झाली.
काय आहे 'यश मायक्रो ग्रेड-II' -'यश मायक्रो ग्रेड-II' हे भाजीपाला, फळझाडे, नगदी पिके, तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य अशा सर्व प्रकारच्या शेतपिकांसाठी द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्ये खत आहे. त्यात आवश्यक १६ सूक्ष्म घटकांपैकी शासकीय मानकानुसार लोह, मंगल (मँगेनीज), तांबे, बोरॉन, जस्त व मॉलिब्डेनम या रसायनांचा प्रमाणानुसार मर्यादित व आवश्यक तेवढा समावेश आहे. या द्रवरूप खताच्या वापराची परिणामकारकता ७५ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होवू शकते.