महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व तृतीयपंथी नागरिकांचा उत्साही सहभाग
नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ अंतर्गत 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता आणि पर्यावरण विषयक विविध कार्यक्रमांचे नियोजन महानगरपालिकेने केले असून त्यामध्ये लोकसहभागावर विशेष भर दिला जात असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वच्छता ही सेवा अभियानाच्या शुभारंभप्रसंगी वृक्षारोपण कार्यक्रमाला नागरिकांची मोठया प्रमाणावर उपस्थिती असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासमवेत तृतीयपंथी नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने दि.17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2025 या पंधरवडा कालावधी ‘स्वच्छता ही सेवा 2025’ हे अभियान राबविण्याचे जाहीर करण्यात आले असून नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 दिवस दररोज स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. त्याचा शुभारंभ से.10 ए येथील मिनी सी शोअर वरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम उद्यानामध्ये वृक्षारोपणाव्दारे झाला.
याप्रसंगी आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, परिमंडळ 2 उपआयुक्त श्री. संजय शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, शिक्षण विभाग उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे, आपत्कालीन विभाग उपआयुक्त श्रीम. ललिता बाबर, समाजविकास विभाग उपआयुक्त श्रीम.नयना ससाणे, उद्यान विभाग उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे, क्रीडा विभाग उपआयुक्त श्रीम. अभिलाषा पाटील, इटीसी सहा.आयुक्त श्रीम. अनुराधा बाबर, वाशी सहा.आयुक्त श्री. सुखदेव येडवे व इतर अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील नागरिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
आज ‘एक पेड माँ के नाम’ या विशेष उपक्रमांतर्गत देशी वृक्षरोपांची डॉ. एपीजे अब्दुल कलाम उद्यानात लागवड करण्यात आली असून याप्रसंगी विविध स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी यांचा उत्साहवर्धक सहभाग होता. यामध्ये किन्नर माँ बचत गट संस्थेतील 125 हून अधिक तृतीयपंथी नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे वाशी विभागातील शालेय विद्यार्थ्यांसह ॲग्नेल स्कुल ऑफ लॉ या महाविद्यालयातील एनएसएस युनिटचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे लेट्स सेलिब्रेट फिटनेस, आई माऊली बहुउद्देशीय सामाजिक संस्था, विद्यासिंधू फाऊंडेशन व इतर महिला बचत गटांतील महिला व ज्येष्ठ नागरिक संघटनांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत उद्या 18 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या शाळांसह खाजगी शाळांमध्येही प्लास्टिक कचरा संकलन व त्याच्या पुनर्प्रक्रियेतून कलात्मक वस्तू निर्मिती असा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. याशिवाय प्रोजेक्ट मुंबई या संस्थेमार्फत प्लास्टिक कच-यापासून बेंच निर्मिती हा उपक्रम राबविला जाणार आहे. या सोबतच नवरात्रौत्सव साजरा करणा-या विविध मंडळांशी व गरबा आयोजित करणा-या संस्थांशी संपर्क साधून झिरो वेस्ट नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी आवाहन करुन त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे.