शिवरायांचा पराक्रम सांगणाऱ्या इतिहासाचा जिवंत ठेवा सर्वांनी पाहण्याचे आवाहन
कल्याण ( शंकर जाधव ) : “हिंदवी स्वराज्यासाठी लढा दिला, तलवारी उगारल्या, रक्त सांडले मात्र कधीच न डगमगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा शस्त्रसंग्रह आणि त्या काळातील नाण्यांचा खजिना पाहण्याची सुवर्णसंधी कल्याणकरांसह इतिहासप्रेमींना प्राप्त झाली आहे. निमित्त आहे ते ऐतिहासिक सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे.
सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सव आणि श्रीराम सेवा मंडळ यांच्या वतीने भरविण्यात आलेल्या या ऐतिहासिक प्रदर्शनाचे उद्घाटन आज कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते झाले. शिवराज्याभिषेक समिती दुर्गराज रायगड यांच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनात महाराजांच्या शौर्याची कहाणी सांगणाऱ्या तलवारी, भाले, कवच, ढाली आणि त्या काळातील नाणी पाहायला मिळणार आहेत. ४ सप्टेंबर रोजी उद्घाटन झालेले हे प्रदर्शन उद्या ५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून सकाळी १०.०० ते रात्री १२.०० या वेळेतमध्ये सुभेदार वाडा हायस्कूल, गांधी चौक, कल्याण (प.) येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
या प्रदर्शनात प्रवेश करताच जणू छत्रपतींचाच आवाज कानावर पडतो “हिंदवी स्वराज्य उभारण्यासाठी उचललेले हे शस्त्र, हेच आमच्या पराक्रमाचे प्रतीक आहे. या नाण्यांनी आमच्या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पराक्रमी वारशाकडे पाहताना आपल्या डोळ्यांमध्ये अभिमान आणि हृदयात स्वराज्याची ज्योत तेवत राहते. त्यामुळे हे प्रदर्शन केवळ शस्त्र-नाण्यांचा परिचय नाही तर तो स्वराज्याच्या इतिहासाशी, पराक्रमाशी आणि संस्कृतीशी थेट संवाद साधण्याचा अनुभव असल्याची भावना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली. यावेळी श्रीराम सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंपी, उपाध्यक्ष सुयोग पटवर्धन, सचिव स्वानंद गोगटे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मंडळाचे संचालक भालचंद्र जोशी हे देखील उपस्थित होते.
दरम्यान हे प्रदर्शन विनामूल्य असून “या दुर्मीळ खजिन्याला भेट देऊन छत्रपतींच्या पराक्रमाची जिवंत साक्ष अनुभवा आणि स्वराज्याचा अभिमान उराशी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. तर सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सव हा कल्याण शहरातील सर्वात जुना असा गणेशोत्सव मंडळ आहे. लोकमान्य टिळक यांच्या उपस्थितीत या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रचण्यात आली असून त्यानंतर शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजन सुरू झाल्याची माहिती शहरातील जुने नागरिक सांगतात. तसेच हा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे कल्याण शहरातील प्रतिष्ठित गणेशोत्सवांमध्ये अग्रगण्य समजला जातो.
