महाराष्ट्र राज्य, ठाणे जिल्हा, कल्याण तालुक्यात वसलेलं सुंदर महादारेश्वर नदीची सीमा असलेला, संत शिरोमणी वै.सु.ह.भ.प.सावळाराम बाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला माझा " हेदुटणे गांव " असा हा सांस्कृतिक वारसा जपणारा गांव, किर्तन, भजनी मंडळ, कवि, गायक, लेखक, हरिपाठ मंडळ, देवींची ( बायाची ) गाणी, सनई बाजा, ब्रास बॅन्ड, बेंन्जो बॅन्ड, घुंगरू नाच ( बाळ्या डान्स ), क्रिकेट, बैल गाडा शर्यती, आणि काही काळ तमाशा गाजवणारे कलावंत, भारुड करणारी मंडळी, अशा बऱ्याच क्षेत्रात उंच शिखरावर, नामांकित आणि कार्यान्वित असलेलं असं हे माझे गांव, म्हणून ह्या गांवाची ओळख," सांस्कृतिक गांव " असं आहे. ह्या आधी ह्या गांवात कोणतेही काम, कुठलाही कार्यक्रम एकजूटीने करण्याची धमकही तशाच प्रकारची होती, आजही आहे, उदाहरण म्हणून गांवदेवी मंदिराचे जिर्णोध्दार करायचं जेव्हा ठरलं तेव्हा गांवची पोरं, लहान, थोर, तरुण, वयस्क लोकं कामाला लागली. आणि प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देऊन भव्य गांवदेवी मंदिर, तसेच हनुमान मंदिर उभारले. पण आता काळाच्या पडद्याआड बरच काही हरवलं आहे. असो.....
आपण मुद्द्यावर येऊ, हेदुटणे गांवाची खरी ओळख म्हणजे येथील पेहलवान, पंचक्रोशीतीलच नव्हे तर एके काळी ठाणे, रायगड, जिल्ह्यात आमच्या पेहलवानाची नांवे प्रसिद्ध होती. माझ्या माहितीप्रमाणे मा. स्व.पे. गणपत काळण वस्ताद यांच्या कारकिर्दीत बरेच पेहलवान झाले, काही त्यानी घडवले, त्यामध्ये कुणी जोडाचे आणि काही बिनजोडाचे कुस्तीचे सामने करायचे, बिनजोडाचे म्हणजे त्यांना कधी कधी जोडच मिळायचा नाही. जोडाचे आणि बिनजोडाचे गणपत वस्तादानी घडवलेले काही पेहलवान, मा.स्व.पे. दगडू पाटील ( सरपंच ), मा.पे.श्री. तुळशीराम काळण ( सरपंच ) मा.स्व.पे. मोहन काळण, मा.पे.श्री. गणपत बा. पाटील, मा.पे.श्री. पंढरीनाथ पाटील, मा.पे.श्री. बुधाजी पाटील, मा.पे.श्री. मनोहर पाटील, मा.पे.श्री. नामदेव भंडारी, मा.पे.श्री. सुकऱ्या कृ.पाटील, मा.पे.स्व. वसंत पाटील, मा.पे.स्व. चिंतामण काळण ,मा.स्व.पे. काळूराम काळण, मा.पे.श्री. काशिनाथ काळण, मा.पे.श्री. नारायण भंडारी, मा.पे.श्री. गोवर्धन काळण, मा.स्व.पे. कृष्णा काळण, मा.स्व.पे. काळूराम भंडारी, मा.स्व.पे. बबन काळण, मा.पे.श्री. हरिश्चंद्र भंडारी, मा.पे.श्री. मुकुंद भंडारी, मा.पे.श्री. उमेश काळण, मा.स्व.पे. बाळाराम पाटील, मा.स्व.पे. सत्यवान काळण, मा.पे.श्री प्रकाश काळण, मा.पे.श्री. फुलचंद्र काळण, मा.पे.श्री. रमेश भंडारी, मा.पे.श्री. शिवदास तरे, मा.पे.श्री.उल्हास पाटील, मा.पे.श्री. लालचंद्र पाटील, मा.पे.श्री. दिलीप पाटील, मा.पे.श्री.जयदास काळण, मा.पे.श्री. किशोर भंडारी, मा.पे.श्री. किशोर काळण, मा.पे.श्री.रमेश पाटील, मा.पे.श्री.संजय काळण, श्री.चैनू पाटील ( भगत ), श्री.दिपक काळण, श्री. सुखदेव काळण, श्री. नितीन काळण,अशी बरीचशी मंडळी नावारुपाला आली होती. आणि कुस्ती स्पर्धेत सहभागी होऊन कुस्ती निकाली काढण्यात तरबेज झाले होते.तसेच आजूबाजूच्या गांवातील म्हणजे कोळेगाव, शिरढोण, अंतार्ली, उंबार्ली या गांवातील पेहलवान देखील आपल्या गावच्या वस्तादाच्या हाताखाली धडे घेवून पेहलवान झाले होते. आम्हाला पण आवड होती पण तसे घडलो नाही. ही आमची शोकांतिका आहे. माझं हेदुटणे गांव म्हटलं की पेहलवानाची ओळख आधी व्हायची, आणि मग आमची ओळख, खुप वेड होतं कुस्तीचं, ह्या आधी कुस्ती खेळण्याची खूप जणांना आवड होती, सवड होती.बऱ्याच कुस्ती खेळाडूनी आपल्या परिस्थितीवर मात करून हा खेळ आबादीत ठेवला होता.असं ऐकण्यात आहे की, गणपत वस्तादाच्या काळात काही लोकांची खायाची मारामारी होती, तरी पण कुस्ती खेळण्याची मस्ती ही शिरपेचात रोवलेली होती. असो.............
हेदुटणे गांवच्या मातीच्या प्रत्येक कणाकणात, तेथील माणसाच्या रक्ताच्या थेंबा थेंबात पेहलवांगी भिडलेली होती आणि आहे, असं दिसतं. काही लोकं मला नेहमी म्हणतात की, तु बाहेर गांवी राहतोस आता ह्या गांवाशी तुझं काही नातंच नाही. त्यांना थोडंसं सांगेन की, माझं माझ्या जन्मभूमीवर खुप प्रेम आहे. आणि माझी नाळ या मातीशी जोडली गेली आहे. ती पण एकदम खोलवर, आज बारा, तेरा वर्षे बाहेर राहूनही मी माझा रेशनकार्ड बदलला नाही. नाही आधारकार्ड वरील पत्ता बदलला,नाही वोटींग आयडी बदलली, असो थोडा विषय आला म्हणून लिहीलं बाकी त्याच्याशी माझा काही वैर नाही. जरी ते मस्करी करत असतील तरी ठिक आहे. पण नेहमी नको, जरी ते टोमणे मारत असतील तरी ठिक आहे. नाहीतरी असे कितीतरी टोमणे आम्ही खिशात घेऊन फिरतो. असो........
आत्ताच्या घडीला खरंच मानवंदना एकच व्यक्तीसाठी ज्याने पेहलवांगी आणि कुस्तीचा खेळ टिकवून ठेवला. दिनांक ०१/०७/१९५९ रोजी जन्मास आलेला, आपली परिस्थिती हालाखीची असताना, शिक्षण फक्त दुसरी पर्यंत झालेला, लिहिता,वाचता येत नव्हतं पण आपली सही मात्र सुंदर सुशिक्षित माणसा प्रमाणे ठेवणारा, आपल्या परिस्थितीवर मात करून कुस्ती खेळण्यासाठी सज्ज झालेला हा अवलिया, कुस्ती बहरात आली, पेहलवान झाला. कुस्ती मारु लागला, पण पोटापाण्यासाठी काय ? म्हणून इलेक्ट्रीशनचं काम शिकून उपजिवीका चालवू लागला. म्हणजे आधी पण त्यांची उपजिवीका चालूच होती, म्हणण्याचं तात्पर्य असं की, जरा खिसा गरम असला की, जरा जीवन बदलतं असं म्हणतात ना तसं बरं का ? त्या नंतर त्यांच लग्नं झालं, मग संसार सुरू झाला. संसारात चटके बसु लागले. "अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर || आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर || या बहीणाबाई ( माई ) चौधरींच्या कवितेप्रमाणे सगळ्यांचच असं होतं, चटके सहन करता करता कधी खटके उडतात कळतच नाहीत.
पण चटके सहन नाही केले तर काहीच मिळत नाही. असं देखील आहे,आणि मग असं करता करता कितीतरी रथी, महारथी धरार्थी पडतात, अशी कितीतरी लोकं मी पाहीली आहेत. आता तुम्ही म्हणाल धरार्थी ? तसे धरार्थी नाही हो, तर सपशेल आपल्या आवडत्या कामातून माघार घेणारी लोकं पाहिली आहेत असं, म्हणायचं आहे मला बरं का ! असा हा हेदुटणे गांवचा भूषण, समाजरत्न '' मा. श्री. नारायण दगडू भंडारी,'' वस्ताद ? प्रश्न चिन्ह ह्यासाठी की मी एकटा ठरवू शकत नाही. पण ह्या माणसाने कुस्तीचा खेळ जवळ जवळ हेदुटणे गांवातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असताना, कुस्तीच्या खेळाचा दिवा तेवत ठेवण्यासाठी गावांतून काही मंडळी आणि भंडारी, म्हात्रे पाडा या ठिकाणावरून काही, आवड असणारी तरुण पिढी एकत्र आणून स्वतः त्या पोरांबरोबर मेहनत घेऊन, आखाड्यात नवीन माती आणून परत कुस्तीचा खेळ चालू केला. काही दिवसांनी गांवातील काही मंडळी खेळण्यास टाळाटाळ करु लागली, पण बहरलेला खेळ टिकवून ठेवण्यासाठी धडपड होती. म्हणून अंतार्ली गांवची काही तरुण मंडळी घेऊन भंडारी पाड्यावर नवीन आखाडा तयार करून पुन्हा कुस्तीचा खेळ चालू केला. बरेच तरुण बाहेरगावी जाऊन बक्षीस जिंकायला लागले, त्यात मा.पे.श्री.विजय संते, मा. पे.श्री. कैलास भंडारी, मा.पे.श्री. रवि म्हात्रे, मा.पे.श्री. दत्ता म्हात्रे, मा.पे.श्री. राजेश भंडारी , मा.पे.श्री. संदीप भंडारी आणि अंतार्ली गांवचा सुपुत्र मा.पे.श्री.गणेश पाटील, असे बरेच कुस्ती पट्टू तयार झाले.पेहलवान वस्ताद नारायण भंडारी यांच्या परिश्रमाला यश येऊ लागलं, पण या सर्व मेहनतीचा कधीही कुठे गाजावाजा केला नाही. ज्या रक्तातच कुस्ती खेळांचा संचार होता, मग तो पठ्ठ्या थांबतो कुठे, आणि असा अंगात संचार असलेला माणूस एकदम पेटलेला, पछाडलेला,असतो. असा माणूस कुठेही, कधीही कुणाच्या सांगण्यावरून थांबत नाही. मग कितीही वादळं आली तरीही, हे सगळं सहन करत असतो. हे सगळं करत असताना त्याने कुणाकडून कुठल्याही मदतीची, किंवा कुठल्या मानधनाची अपेक्षा ठेवली नाही.
अशी अपेक्षा नसताना लोकांचे टोमणे सहन करत होता. पण कुणाशी वाद घातला नाही. कुस्ती खेळण्याची आवड आणि कुस्ती खेळाशी एकनिष्ठा यामध्ये जगलेला हा माणूस, आणि ती एकनिष्ठता आजतागायत कायम मनात आहे. म्हणून असा ह्यासमान वस्ताद, पेहलवान आपल्या पंचक्रोशीत आजपर्यंत मि तरी पाहीलेला नाही. खरंच हा माणूस नसता तर कदाचित कुस्ती खेळ हेदुटणे गावांतून हद्दपार झाला असता, आणि तोही कायमचा, मग आता काही मंडळी म्हणेल "आम्ही अजून जिवंत आहोत"! आम्ही जीवंत ठेवला असता हा खेळ ? बरोबर आहे पण जंग ( गंज ) लागलेली तलवार म्यानात गेली की, तिला धार करून चार वार करायला खुप मेहनत घ्यावी लागते. तसं पाहिलं तर आधी या कुस्ती खेळाला बऱ्याच पेहलवान मंडळीचा हातभार होता. आपला संसार सांभाळून सगळ्यांनाच आपलं स्वप्न साकार करता येत नाहीत, दुसरं कारण म्हणजे गांवात शिरलेलं अतीराजकारण, असं राजकारण गांवात शिरलं की, गांवाचं वाटोळं झालंच म्हणून समजा, मग नुसता गांव चांगला असून फायदा होत नाही. मग काय तर , "गांव तसा चांगला आणि वेशीला टांगला," या उक्तीप्रमाणे गांवाचं सार्वभौमत्व अंधारात जातं. अशा राजकारणातून आमचं गांव सावरलं ते महत्वाचच नाही का ? असो.......
आपला संसार, पोरबाळं, कामधंदा सांभाळून त्यांनी बरेच कुस्ती पट्टू घडवले, आजही घडवत आहेत. सध्याच्या पहाण्या नुसार कुस्ती मध्ये अग्रगण्य कु. प्रेम पाटील मा.स्व.पे. दगडू पाटील यांचा नातू, यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड पण झाली होती. असं ऐकण्यात आहे. आताच्या चालू स्थितीत लाल मातीत घाम गाळून तयार होणारी पेहलवान मंडळी, कु. यश काळण, कु. किरण काळण, कु. हर्षद ब. काळण, कु. अनिकेत भंडारी, कु. आदित्य भंडारी, कु. मित पाटील, कु. हर्षद ह.काळण, कु. सोहम म्हात्रे, कु. सार्थक भंडारी, कु. दर्शन काळण, कु. यथार्थ म्हात्रे, कु. विराज भंडारी, कु. बबल्या, कु. कुणाल पाटील, कु. योगेश भंडारी, कु. अर्जून काळण, कु. योगेश भंडारी, हेदुटणे गांव, कु.सुमित ठाकरे, कु. गौरव बडेकर, चिरड गांव, कु. साहील गायकर ,कु.ओम गायकर, घेसर गांव, कु. विकास चितले, पोसरी गांव, कु. आतिष घरत, खिडकाळी गांव, अशी ही आता तरुण तडफदार मंडळी, कुस्ती पट्टूंचा ताफा सज्ज होत आहे. तो सुद्धा वस्ताद मा. नारायण भंडारी यांच्या देखरेखीखाली मोठ्या दमाने आणि उत्साहाने, कुस्ती पट्टू तयार होत आहेत. मेहनत, चिकाटी, आणि समाजाची बांधिलकी, कर्तव्य दक्ष असा हा माणूस आपण आत्मसात केलेले डावपेच गुरु द्रोणाचार्यांसारखे आपल्या शिष्यांना शिकवत आहे. ही काही अतिशयोक्ती नाही. असा हा कळीयुगी द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना प्रशिक्षण देऊन नवीन कुस्तीगिरांची पिढी मोबाईल च्या जमान्यात घडवत आहे.
तसे पाहिले तर समाजाशी बांधिलकी ठेवून प्रशिक्षण देणारा, शिक्षण घेणारा किंवा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना गांव भूषण, समाज भूषण, समाजरत्न अशी नामांकन मिळायला हवीत, उदाहरण द्यायचे झाले तर, श्री. सुरेश मढवी, उंबार्ली गांव, यांनी आगरी समाजाची आर्थिक स्थिती आणि सामाजिक बांधिलकी या विषयावर PHD केली आहे, श्री. लालचंद्र संते कोळे गांव, यांनी ठाणे जिल्ह्यातील ठाकुर आणि कातकरी जमातीचा आर्थिक व सामाजिक विकासाचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर PHD केली आहे, सौ. प्रमिला पाटील कोळे गांव, यांनी रेल्वे विकास या विषयावर PHD केली आहे. श्री. विश्वनाथ भंडारी हेदुटणे गांव हे मराठी विशिष्ट लेखक या विषयावर PHD करत आहेत, अशी लोकं खरं तर गांव भूषण, समाजरत्न , समाज भूषण, पुरस्काराचे मानकरी आहेत.असं मला वाटतं आणि त्यांना ते मिळायलाच पाहिजे, असो.........
माझं म्हणणं असं आहे की, असा अवलीया समाजाला एखाद्या उंच शिखरावर नेऊन ठेवण्यासाठी धडपड करत असेल आणि आपण नकळत डोळेझाक करत असू, तर असं करणं कितपत योग्य आहे ? मा. पे. श्री. नारायण दगडू भंडारी वस्ताद हेदुटणे गांव ह्यांना आणि समाजात परिवर्तन, घडवून प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या अशा लोकांना जर आपण योग्य वेळी योग्य सन्मान दिला तर अजून मेहनत घेऊन समाजासाठी ते आपलं योगदान द्विगुणित करुन आपल्याला उपकृत करतील यात काही तिळ मात्र शंका नाही. कारण सगळेच अशा मताचे नसतात. समाजात मिरवणारे, मिरवणूक काढणारे खूप असतील पण आपल्या समाजाला मिरवणारे, उंच शिखरावर नेऊन ठेवणारे खूप कमी आहेत. पैशासाठी झुंबड घालणाऱ्या लोकांना खुप पुरस्कार मिळतात, मग अशा लोकांना असे पुरस्काराचे नामांकन का नाही ? तर तो मिळायलाच पाहिजे, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. असो.......
अशा लोकांना, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही माझी छोटीसी धडपड, म्हणून हा लेख, चुकुन कुणाची नांवे राहीली असतील तर क्षमस्व, आणि चुकून कुणी दुखावला असेल तरीही , " करा क्षमा अपराध,| महाराज तुम्ही सिध्द || किती केलं तरी वाचणारा सर्वश्रेष्ठ म्हणून मला लिहीणाऱ्याला माफ करा.
लेख :- राजेश शांताराम पाटील ©®
