ठाणे,दि.0 6:- कल्याण तालुक्यामध्ये दि.17 सप्टेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवडा” राबविण्यात आला असून या मोहिमेमध्ये जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून “महसूल अदालत” हा उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने तहसिल कार्यालयात दि.01 ऑक्टोबर 2025 रोजी महसूल अदालत हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
या अभियानांतर्गत एकूण 16 प्रकरणासाठी “महसूल अदालत” राबविण्यात आली असून त्याकरिता कल्याण कोर्टातील सर्व अधिवक्ता / मंडळ अधिकारी / ग्राम महसूल अधिकारी यांना कळविण्यात आले होते. प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या अनुषंगाने तहसिलदार व नायब तहसिलदार यांच्या समक्ष चालणारी एकूण 16 प्रकरणे महसूल अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. यामध्ये सर्वप्रथम पक्षकार व अधिवक्ता यांना “महसूल अदालत” संकल्पनेबाबत माहिती देण्यात आली. प्रस्तुत दावा परस्पर समजुतीने निकाली काढल्यास दोन्ही पक्षकारांना न्याय मिळवून त्यांचा वेळ व परिश्रम यांची कशी बचत होईल याबाबत समजावून सांगण्यात आले.
सर्व प्रकरणात सुनावणी घेतल्यानंतर एकूण 2 प्रकरणात परस्पर संमतीने दावा निकाली काढण्याबाबत दोन्ही पक्षकारांनी मान्यता दिली. यापैकी मौजे दावडी, ता.कल्याण येथील एक दावा / वाद मागील 15 वर्षापासून प्रलंबित होता. या दाव्यांबाबत महसूल मंत्री महोदय यांच्या समक्ष सुनावणी सुरु होती. यावेळी महसूल मंत्री महोदय यांनी हे प्रकरण परस्पर समजुतीने सोडविण्याबाबत निर्देश दिले होते. या प्रकरणी उभय पक्षकार यांच्याशी चर्चाविनिमय करुन दोघांच्या संमतीने दाव्यामध्ये आपाआपसात समझोता मान्य करण्यात आला व मागील 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित असलेला वाद निकाली निघाला.
यापुढे दर तीन महिन्यांनी महसूल अदालतीचे आयोजन करुन जास्तीत जास्त दावे परस्पर समजुतीने निकाली काढण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. या महसूल अदालतीच्या वेळी सबंधित दाव्याच्या अनुषंगाने अधिवक्ता व पक्षकार हजर होते. तसेच तहसिलदार कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार, नायब तहसिलदार (महसूल) हजर होते. या कार्यक्रमातून शासनाचा सकारात्मक व लोकाभिमुख चेहरा लोकांसमोर मांडला जात आहे, असे कल्याण तहसिलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले आहे.
