कोकण : कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि श्री प्रभू विश्वकर्मा पांचाळ मनु-मय संस्था, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एस. पी. एम. रोडवरील विश्वकर्मा मनु-मय संस्थेच्या सभागृहात दिवाळी फराळ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दीपप्रज्वलन करून व विश्वकर्मा देवाचे स्मरण करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये विश्वकर्मा संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर सुतार, सेक्रेटरी किशोर कणबरकर, डायरेक्टर महादेव तोंडकर, विनायक देसाई, रंजना मोदगेकर (महिला मंडळ व्हाइस प्रेसिडेंट), सुनीता सुभेदार (सुवर्ण कर्नाटक मानव अधिकार जिल्हाध्यक्ष), प्रदीप सुतार, प्रसन्ना लोहार, धर्मा लोहार आणि प्रशिक्षक अर्चना व उज्वला पाटील यांचा समावेश होता.
या प्रशिक्षणामध्ये महिलांना ११ प्रकारच्या पारंपरिक दिवाळी फराळाच्या पदार्थांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. एकूण २७ महिलांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणार्थींनी मनोगतातून या उपक्रमाचा त्यांना मोठा आत्मविश्वास व प्रेरणा मिळाल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विश्वकर्मा संघाचे अध्यक्ष भरत शिरोळकर यांनी बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे असे सांगितले. महिलांनी स्वतःचा उद्योग सुरू करावा यासाठी त्यांनी हॉल विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
हा उपक्रम महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक प्रभावी पाऊल असून त्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण संस्थेच्या श्रीदेवी दंडकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
