Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

अकोल्याचा ‘कलासक्त योद्धा’ वैभव सांगळे यांची चित्रकला; जनपथ प्रदर्शनात ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

नवी दिल्ली : जन्मजात कर्णबधिरतेवर दुर्दम्य इच्छाशक्तीने मात करत, चित्रकलेच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारे अकोल्याचे सुपुत्र, चित्रकार वैभव तानाजी सांगळे हे सध्या नवी दिल्लीतील जनपथ, हँडलूम हाट येथे आयोजित 'स्पेशल एक्सपो: सूत्रांचा प्रवास' (द जर्नी ऑफ थ्रेड्स )मध्ये सहभागी झाले आहेत. वस्त्र मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित या सात दिवसीय प्रदर्शनात वैभव सांगळे यांच्या चित्रांतून साकारलेल्या 'भावस्पर्शी कलाविष्काराने' अनेक कला रसिकांचे लक्ष वेधले आहे.

भारतीय पारंपरिक हातमाग आणि हस्तशिल्प कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या विशेष प्रदर्शनात देशभरातील ७५ विणकर, स्वयं सहायता गट (SHG) आणि सहकारी संस्था भाग घेत आहेत. १६ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध राज्यांचे कलाकार आपापल्या क्षेत्रातील पारंपरिक वस्त्र आणि शिल्पकला प्रदर्शित करत आहेत.

या प्रदर्शनात वैभव तानाजी सांगळे यांच्या स्टॉलला उत्तम प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या पोट्रेट्स, निसर्ग चित्र, ग्रामीण जीवन आणि वारली पेंटिंग्जमध्ये आढळणारी 'प्रवाही आणि भावनिक अभिव्यक्ती' ही कलाकृतींची प्रमुख वैशिष्ट्ये ठरत आहेत.

'कलासक्त योद्धा' वैभव सांगळे: प्रेरणादायी प्रवास आणि सर्वोच्च सन्मान

वैभव सांगळे यांना त्यांच्या अदम्य जिद्द आणि कलेच्या सामर्थ्यावर कर्णबधिरतेवर मात करून केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सन २०२३ चा 'राष्ट्रीय सर्वश्रेष्ठ दिव्यांग जन पुरस्कार' जाहीर झाला होता. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने गेल्या ३ डिसेंबर २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त विज्ञान भवन, दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी आपल्या अनाथ, अपंग, दिव्यांग बांधवांना, सीमेवरच्या जवानांना, बळीराजांना, डॉक्टरांना, गुरुजनांना, शास्त्रज्ञांना आणि कष्टकऱ्यांना समर्पित केला होता.

संघर्षातून साकारलेले शिक्षण

जन्मतः कर्णबधिर असल्याने चौथ्या वर्षापर्यंत बोलता-ऐकता न येणाऱ्या वैभव यांचे कर्णबधिरत्व त्यांच्या आई-वडिलांच्या (स्वतः स्पीच थेरपी शिकून) अथक प्रयत्नांमुळे ७०% पर्यंत कमी झाले. वयाच्या चौथ्या वर्षापासून वडिलांनी हातात पेन्सिल-ब्रश देऊन चित्रकलेची आवड निर्माण केली. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी दहावी-बारावीत प्रथम क्रमांक मिळवला आणि चित्रकलेच्या सीईटी परीक्षेत अपंगातून प्रथम येऊन मुंबईतील प्रतिष्ठित सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश मिळवला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कलेचा गौरव:

वैभव यांच्या कलाकृतींनी सातासमुद्रापार मजल मारली असून, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, रशिया, फ्रान्स यांसारख्या देशांमध्ये त्यांची कला पोहोचली आहे. अमेरिकन दूतावास, मुंबई येथे त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या 'दिव्य कला प्रदर्शनी'त निवड झाल्यानंतर, भारत सरकारच्या 'दिव्य कला मेळाव्यां'मध्ये दिल्ली, मुंबई, भोपाळ, गोवा, गुहाटी अशा विविध शहरांमध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, ज्यात मुंबई येथे त्यांना 'बेस्ट डिस्प्ले अवॉर्ड' मिळाला होता.

राष्ट्रपती भवनात विशेष सन्मान

एकाच वर्षात राष्ट्रपती भवनाकडून दोनदा सन्मानित होण्याचा दुर्मीळ मान वैभव यांना मिळाला. त्यांनी काढलेले राष्ट्रपती महोदयांसाठीचे खास पेंटिंग राष्ट्रपती भवनात लावण्यात आले असून, त्यांच्या चित्रांचे तीन दिवसीय प्रदर्शनही राष्ट्रपती भवनात भरवण्यात आले होते.

सामाजिक बांधिलकी आणि समर्पण

कर्णबधिर बांधवांना, ग्रामीण भागातील महिलांना तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुलांना मोफत प्रशिक्षणाची इच्छा बाळगणाऱ्या वैभव यांनी समाजाप्रती आपले कर्तव्य मानून अनेक अनाथ आश्रमांमध्ये आणि दिव्यांग बांधवांना निशुल्क पेंटिंगचे प्रशिक्षण दिले आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या महिलांच्या स्वयंरोजगार प्रशिक्षणामध्ये त्यांनी वारली पेंटिंग्जचे प्रशिक्षण दिले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |