डोंबिवली ( शंकर जाधव ) : व्यसनापासून दूर राहून आपण शरीर आणि तंदुरुस्तीसाठी नित्यनियमाने व्यायाम करायचा आहे कारण देशाच्या युवा पिढीला आपल्या समोर आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी २०४७ ला विकसित भारताचं ध्येय ठेवलंय ते गाठायचं आहे. त्याच बरोबर आपल्या *डोंबिवलीला सर्व क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी तंदुरुस्त शरीर हे माध्यम आहे म्हणूनच तन आणि मन फिट ठेवण्यासाठी डोंबिवलीकर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्याचे उद्गार भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काढले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, कल्याण परिमंडळ पोलीस उपायुक्त, आंतरराष्ट्रीय पदकविजेती बॉक्सर साक्षी चौधरी आणि सुप्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी यांनी स्पर्धा सुरु झाल्याचा झेंडा दाखवून स्पर्धेस प्रारंभ केला.*
रविवारी डोंबिवलीत झालेल्या डोंबिवलीकर मॅरेथॉन स्पर्धेत विविध खुल्या व स्पर्धात्मक गटांत सुमारे ६५०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात २१ किमी अर्ध मॅरेथॉन पुरुष गटात राज तिवारी व महिला गटात अमृता पटेल यांनी प्रथम क्रमांक पटकवला. तर १० किमी पुरुष गटात सूरज झोरे व महिला गटात रिंकी सिंग विजयी ठरले. तसेच ५ किमीच्या पुरुष गटात ओंकार कुंभार गटात व महिला गटात पायल विश्वकर्मा यांनी बाजी मारली.
कठोर परिश्रम, इच्छाशक्ती आणि जिद्द हे ज्या माणसामध्ये हे तीन गुण असतील, तो जमिनीवरून उठून आभाळाला गवसणी घालू शकतो. यावर विश्वास ठेवून हजारो स्पर्धकांनी डोंबिवलीकर मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला होता. ७५ वर्षांच्या आजी आजोबांपासून सहा सात वर्षांच्या छोट्या छोट्या बालकांपर्यंत स्पर्धकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. क्रीडाकौशल्य दाखवता यावं यासाठी कल्याण डोंबिवली रनर्स ग्रुप आणि डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवाराच्या वतीने डोंबिवलीकर मॅरेथॉन व फ्रेंडशिप रन २०२५ या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते.
आपल्यातल्या अनेकांना आयुष्यात एकदातरी काहीकाही गोष्टी करायच्या असतात. मुंबई पुणे इथे जागतिक दर्जाच्या मॅरेथॉन होतात. या दर्जेदार मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हायचं स्वप्न अनेक जण बाळगतात. ती इच्छा या निमित्ताने पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया महिलांच्या एका समूहाने दिली. आता कल्याण डोंबिवलीकरांना आपल्या हक्काची मॅरेथॉन स्पर्धा आहे ती म्हणजे डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन असा दुजोरा अनेक हौशी स्पर्धक डोंबिवली देत होते . मुंबई ठाणे वाशी कल्याण अंबरनाथ बदलापूर पनवेल कर्जत खोपोली कसारा इतकेच नव्हे तर विरार, रत्नागिरी, वापी, अहमदाबाद इथल्या स्पर्धकांनीही स्पर्धेत भाग घेतला.
ही स्पर्धा २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि १.६ किलोमीटरचा फन-रन अशा विविध टप्प्यांमध्ये संपन्न झाली.
