भिवंडी प्रतिनिधी - मिलिंद जाधव : वाढत्या नागरीकरणामुळे चर्चेत असलेल्या भिवंडी तालुक्यातील पडघा येथे कॅनरा बँकेची नवी शाखा नुकतीच सुरू झाली. मुंबई सर्कल हेड रंजीव कुमार, ठाणे जिल्ह्याचे रिजनल हेड सुधांशू शाहू आणि पडघा शाखेचे मॅनेजर नेहल नागदेवे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
कॅनरा बँकेची ही ठाणे जिल्ह्यातील ५५ वी शाखा असून, स्थानिक नागरिकांना सर्वोत्तम बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प असल्याचे मुख्य महाप्रबंधक रंजीव कुमार यांनी सांगितले. बँकेद्वारे विविध सरकारी योजना, कर्जसुविधा, डिजिटल बँकिंग, महिला व शेतकरी वर्गासाठी उपयुक्त सेवा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभाव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ग्राहकांना तत्पर आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या काळात पडघा परिसर वेगाने विकसित होत असून आर्थिक क्रियाशीलताही वाढत आहे. त्यामुळे कॅनरा बँकेची शाखा येथील विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास रंजीव कुमार यांनी व्यक्त केला. उद्घाटन
प्रसंगी पडघा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रवींद्र विशे, श्रीकांत गायकर, गुरुनाथ जाधव, शैलेश बिडवी, पोलिस पाटील राजेश साळुंखे, अभिषेक नागावेकर यांच्यासह तालुक्यातील व्यापारी, उद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
