Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

दशावतार कलावंत यश जळवी यांना ‘यू इन्स्पायर’ पुरस्काराने गौरव

मुंबई | कोकणाच्या पारंपरिक दशावतार कलेला आधुनिक काळात नवसंजीवनी देणारे आणि या कलेच्या जतनासाठी अखंड परिश्रम करणारे गुणी कलाकार यश (योगेश) जळवी यांना मुंबईत झालेल्या कोकण कला महोत्सवात प्रतिष्ठेचा ‘यू इन्स्पायर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कोकण संस्थेच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार या वर्षी यश जळवी यांना मिळाल्याने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

दशावतार या पारंपरिक लोककलेतील स्त्रीपात्र साकारण्यात यश जळवी यांना विलक्षण प्रभुत्व लाभले आहे. त्यांच्या अभिनयाची आणि भावविश्वाची खोली अशी की, रंगमंचावर ते स्त्री वेशभूषेत उतरल्यावर प्रेक्षक क्षणभर वास्तव विसरतात. आजच्या काळात दशावतारात स्त्री पात्रे साकारणारे कलाकार फारच कमी झाले असताना, या परंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या यश जळवी यांच्या कामगिरीचा हा सन्मान असल्याचे दयानंद कुबल यांनी गौरवोद्गारांत सांगितले.

दशावतार कलेवर आधारित ‘दशावतार’ या मराठी चित्रपटातही यश यांनी आपल्या अभिनयाने ठसा उमटवला होता. त्यांच्या आवाजातील माधुर्य, संवादफेक आणि भावनांचे सूक्ष्म चित्रण यामुळे ते दशावतारातील एक ओळख निर्माण करणारे नाव ठरले आहे.
“हा सन्मान म्हणजे माझ्या कलागुणांचा नव्हे, तर दशावतार या प्राचीन कलेचा सन्मान आहे. कोकण संस्थेने दिलेले हे प्रोत्साहन मला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देईल. मी या सन्मानासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रेमासाठी सदैव ऋणी आहे.”( यश जळवी )
या भव्य सोहळ्याला पद्मश्री मुरलीकांत पेटकर (चंदू चॅम्पियन फेम), अभिनेते अविनाश नारकर, लेखक दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर, वाशिष्ठी दूध प्रॉडक्ट्सचे संचालक प्रशांत यादव, सामाजिक कार्यकर्ते शरदचंद्र आढाव, कन्टेन्ट क्रिएटर साहिल दळवी, सार्थक सावंत, तसेच विंग कमांडर वैष्णवी टोकेकर आदी मान्यवर उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |