मालवण : कोकण एनजीओ इंडियाच्या वतीने काळसे ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने काळसे ग्रामपंचायतीत ग्रासकटर व सॉ मशिन दुरुस्तीचे एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाला ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांची उपस्थिती लाभली. कोकण एनजीओचे समन्वयक महेश भगत व शशीकांत कासले यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शन व समन्वय केला.
प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन शेतीकामात अत्यावश्यक ठरणाऱ्या ग्रासकटर व सॉ मशिनच्या वापरातील तांत्रिक बाबी, सामान्य बिघाडांची कारणे, प्राथमिक दुरुस्ती, मशीनचे मेंटेनन्स आणि सुरक्षित वापर पद्धती यांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे कामात होणारा विलंब आणि अनावश्यक खर्च टळण्यास मदत होणार आहे.
या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांसाठी अनेक लाभ होणार असून त्यात ग्रासकटर व सॉ मशिनची स्वतः दुरुस्ती करता येणार असल्याने वेळ व खर्चाची बचत होईल, शेतीकामातील गती वाढून उत्पादकता वाढण्यास मदत होईल, हंगामी कामे वेळेत पूर्ण होऊन पीक उत्पादन वाढण्यासाठी मदत होईल. मशीनच्या योग्य देखभालीमुळे त्यांचा वापरकाळ वाढणार आहे.
कोकण एनजीओ इंडियाच्या पुढाकारामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळाली असून, आगामी काळात अशा प्रकारचे प्रशिक्षण शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अधिक परिणामकारक ठरणार आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
