डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिररोडवरील स्मशानभूमी नुतनीकरणासाठी बंद करण्यात आली होती.याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवार १ तारखेला महापालिकेचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांना जाब विचारला. मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष राहुल कामत, योगेश पाटील, अरुण जांभळे, राजू पाटील यासह अनेक मनसैनिक शिवमंदिररोडवरील स्मशानभूमीत गेले होते.
महापालिकेच्या वतीने ज्या स्मशानभूमींच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत तिथे प्राथमिक सुविधांची पूर्तता न केल्याचे मनसेने म्हणणे आहे. याबाबत डोंबिवली शहरअध्यक्ष राहुल कामत म्हणाले, ही स्मशानभूमी नुतनीकरणासाठी पूर्ण बंद करण्यापूर्वी इतर स्मशानभूमीमधे सुविधांसह २४ तास कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी करतानाच शिवमंदिर स्मशानभूमीचा बंद झाल्यापासून सुरु होण्यापर्यंतचा कालावधी निश्चित करावा व या सर्व गोष्टी होत नाहीत तोपर्यंत सदरची स्मशानभूमी बंद करु नये. तात्काळ ही स्मशानभूमी पुढील चर्चेनंतरच बंद होईल अशी माहिती प्रशासनाने दिली. इतर कोणत्याही कारणास्तव शिवमंदिर स्मशानभूमी कायमची बंद करण्याचा घाट घातला तर गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आहे अशी स्पष्ट ताकीद मनसे कडून देण्यात आली.
या प्रसंगी मनसेचे महिला सेनेसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
