डिजिटल गव्हर्नन्स आणि 'AI' च्या वापरावर भर, डिजिटल बदलांवर भर
ठाणे,दि.23 : माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने देशव्यापी सुशासन सप्ताह सुरु केला आहे. प्रशासन जनतेसाठी काय करते याची माहिती व्हावी, हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य जनतेला सेवा सुविधा उपलब्ध करून देवून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज येथे दिले. प्रशासकीय कामात पारदर्शकता, गती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनसेवा अधिक कार्यक्षम करण्यावर या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सुशासन सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यशाळेत अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, तहसिलदार (सामान्य प्रशासन) सचिन चौधर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, कुळगाव बदलापूर मुख्याधिकारी मारुती गायकवाड, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अभिषेक पवार यांच्यासह इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले, जिल्हा प्रशासनाकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, हे आपले प्रमुख काम आहे. त्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करणे, सार्वजनिक तक्रारी निर्गत करणे, ऑनलाईन सेवेमधील विलंबितता टाळून त्या पुरविणे आदी कामे गतीने करावीत. आपल्याकडे आलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक किंवा सामाजिक समस्या व्यवस्थितपणे ऐकून घेत त्यांना प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांने हसतमुखाने उत्तर देवून त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, प्रत्येकाने कामकाज केल्यानंतर त्याचे लिखाण करणे, त्याच्या नोंदी अद्ययावत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. “प्रशासन गाव की ओर” ही एक अतिशय महत्वाची संकल्पना असून अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगले काम करण्याची संधी आहे.
ते म्हणाले, केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या निर्देशानुसार या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा केंद्र शासनाचा स्तुत्य उपक्रम असून कामकाज करताना पारदर्शकता असली पाहिजे आणि कामकाज विहित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. या उपक्रमात सार्वजनिक सेवेचे वितरण, तक्रार निवारण, पारदर्शकता या तीन महत्वाच्या बाबी आहेत. कायदा व व्यवहाराची सांगड घालून तसेच मानवी दृष्टीकोन व सहानुभूतीचा दृष्टीकोन ठेवून जनतेचे प्रश्न सोडवावेत.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ पुढे म्हणाले की, "डिजिटल साधनांचा वापर केल्यामुळे प्रशासकीय कामात मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढते. नागरिकांना कार्यालयात न येता सेवा मिळाव्यात, हेच सुशासनाचे खरे यश आहे.". प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि 'ई-गव्हर्नन्स'चा प्रभावी वापर करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखून काम करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करणे आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच सुशासनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यशाळेत सादर करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले असून, जिल्हयातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध शासकीय विभागांनीही अशाच प्रकारे डिजिटल प्रणालीचा अवलंब करावा, अशा सूचना दिल्या.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक तहसिलदार (सामान्य प्रशासन) सचिन चौधर यांनी केले तर आभार जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी मानले. या कार्यशाळेत जिल्हा परिषद, कुळगांव बदलापूर नगरपालिका, जिल्हा नियोजन कार्यालय, कृषी विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय या शासकीय विभागांनी जिल्ह्यात सुशासन उपक्रमांतर्गत राबविलेल्या योजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थितांना दाखविली.
