ठाणे :- “प्रत्येक महिन्यातील एक दिवस सैनिकांसाठी समर्पित करणार असून, त्या दिवशी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणींवर प्राधान्याने कार्यवाही केली जाईल. तसेच ध्वजदिन निधी संकलनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येणार आहेत,” असे ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जाहीर केले.
ठाणे जिल्ह्याचा ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ जिल्हाधिकारी व ध्वजदिन समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षेतेखाली आज नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे झाला. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी व अपर जिल्हादंडाधिकारी हरिचंद्र बा. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदिप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके, भारतीय नेव्ही कमांडर मनजित वत्स, भारतीय नेव्ही सब. लेफटनन्ट देव शंकर त्रिपाटी, भरतीय नेव्हीचे प्रविण उत्तम लोंढे नवी मुंबई सहायक पोलीस आयुक्त निलम वाव्हळ, ठाणे ग्रामीण पोलीस व मेजर प्रांजळ जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर व विविध कार्यालयांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, “देशाच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांचे आपण सर्व ऋणी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची ही एक संधी आहे. त्यामुळे ध्वजदिन निधीसाठी नागरिकांनी, संस्थांनी आणि सर्व कार्यालयांनी सढळ हस्ते मदत करावी.”
माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमांसाठी संपूर्ण देशात 07 डिसेंबर हा दिवस ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो व त्यानिमित्ताने 07 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर पर्यंत ध्वजदिन निधी गोळा केला जातो. त्या दिनाच्या निमित्ताने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने आयोजित केलेल्या सभारंभामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ध्वजदिन निधी संकलनास आज प्रारंभ केला. महाराष्ट्र शासनाकडून ठाणे जिल्ह्यास गतवर्षी रु. 2 कोटी 6 लाख एवढे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दीष्ट देण्यात आले होते त्यापैकी 100% उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले आहे.
भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करुन त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी व युध्दात अपंगत्व आलेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्याकरीता या निधीचा विनीयोग केला जातो. सैनिकांप्रती समाजाचे काही ऋण आहे. देशाचे आणि स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करताना उद्भवणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्था विषयक समस्या, अतिवृष्टी, वादळ किंवा भूकंप सारख्या आपत्तीत दुर्दैवी नागरीकांच्या सहाय्याला त्वरेने धावत जावून बहुमोल कामगिरी बजावणाऱ्या आपल्या सेनिकांचे ऋण अल्पस्वरुपात फेडण्याची संधी जनतेला ध्वजदिन निधीच्या निमित्ताने प्राप्त होत असते. तरी आपली बहुमोल मदत सढळ हस्ते जिल्हाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे यांच्या नावे धनादेश/धनाकर्ष किंवा QR कोड द्वारे करून ध्वजदिन निधीस सक्रीय हातभार लावावा व सैनिकांचे मनोवल वाढवावे असे आवाहन जिल्हाधिकारी ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, (भा.प्र.से.) यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ज्या कार्यालयांनी ध्वजदिन निधी संकलन 2024 करीता दिलेले उद्दिष्ट 100% पूर्ण केले व ज्या कार्यालयांनी उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचे अभिनंदन केले. जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या ज्या पाल्यांनी इ. 10वी मध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळविले. अशा पाल्यांचा सेनिक कल्याण विभागा मार्फत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते शॉल-श्रीफळ, प्रशस्तीपत्र आणि रु.10,000/- चा धनादेश देवून विशेष गौरव करण्यात आला.
