पाहणी नंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी समाजमंदिरात तात्पुरती शाळा सुरू करण्याचा विचार. - आमदार राजेश मोरे
डोंबिवली ( शंकर जाधव) : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काटई गावातील प्राथमिक शाळेची इमारत अत्यंत जीर्णावस्थेत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश मोरे, शिवसेना नगरसेवक अर्जुन पाटील यांनी या ठिकाणीची पाहणी केली. शाळेची सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थी व शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने तातडीने उपाययोजना करण्याबाबत गावकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.पाहणी नंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी समाजमंदिरात तात्पुरती शाळा सुरू करण्याचा विचार असल्याचे आमदार मोरे यावेळी म्हणाले.
गावकऱ्यांनी यापूर्वीही नवीन शाळा बांधण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या खासदार निधीतून कटाई गावात समाजमंदिर बांधन्यात आले आहे.
शाळेची सद्यस्थिती अत्यंत खराब असल्याने विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षणकर्मींवर कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी नवीन शाळेची इमारत उभी राहत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात शाळा समाजमंदिरात सुरू करण्याचा पर्याय या पाहणी दौऱ्यात चर्चेत घेण्यात आला. याबाबत गावकऱ्यांनीही सकारात्मक भूमिका मांडत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी केली.या पाहणी आणि चर्चा वेळी अर्जुन पाटील, नगरसेवक, गजानन पाटील, समाजसेवक यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
