डोंबिवली ( शंकर जाधव ) : सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून १९७६ दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा मिळाला.टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित टिळकनगर विद्यामंदिर ही डोंबिवलीतील अत्यंत जुन्या मराठी शाळांपैकी एक आणि प्रथितयश मराठी माध्यमाची शाळा आहे. अमृतमहोत्सवी वाटचाल पूर्ण केलेल्या या शाळेचा नावलौकिक डोंबिवलीत आजही कायम आहे.
या मराठी माध्यमाच्या शाळेतून कित्येक पिढ्या शिक्षण व संस्कार घेऊन बाहेर पडल्या आहेत व जगभरात आपले कर्तृत्व गाजवित आहेत.१९७६ साली शाळेतून दहावी झालेल्या बॅचचे विद्यार्थी आज साठी-पासष्ठी पार केलेले ज्येष्ठ नागरिक आहेत. तरीही शाळेने दिलेले संस्कार अजूनही त्यांच्या आचरणात दिसून येतात आणि या सगळ्यांनाच शाळेबद्दल विशेष ममत्व वाटत आले आहे.
यंदाच्या वर्षी शाळा सोडून तब्बल ५० वर्षे पूर्ण झाली ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आणि शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या निमित्ताने या बॅचच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या बॅचचे माजी विद्यार्थी संमेलन रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाच्या दिवशी शाळेतच आयोजित केले होते.
त्यास त्या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला व जवळपास ८० हून अधिक विद्यार्थी विविध ठिकाणांहून म्हणजे डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, टिटवाळा, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर इ. ठिकाणांहून तर आली होतीच. परंतु अगदी बंगलोर, निपाणी इ. राज्याबाहेरून सुद्धा आली होती एवढच काय एक विद्यार्थिनी तर अगदी इस्रायल वरून देखील आली होती.
शाळेच्या पेंढरकर सभागृहात उत्तम सजावट केली होती. संस्कारभारतीच्या कलाकारांनी काढलेली प्रसंगोचित अशी अतिशय देखणी रांगोळी, आलेल्यांचे अत्तर लावून, गुलाब पुष्प व पेढा देऊन स्वागत आणि मंद सुरातील सनई यामुळे वातावरण अगदी प्रसन्न झाले होते.
प्रथेप्रमाणे श्रीसरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. सर्व उपस्थित मंडळींचे स्वागत आणि आलेल्या सर्व मंडळींचा परीचय घेण्यात आला. विशेष म्हणजे काही मित्र मैत्रिणी अक्षरशः ५० वर्षांनीच एकमेकाना भेटली असल्याने त्यांची एकमेकांना ओळख पटणे देखील अवघड होते.
कार्यक्रमा दरम्यान शाळेबद्दलच्या विद्यार्थ्यांच्या आठवणींचे कथन व वाचन करण्यात आले, बॅचमधील काही विद्यार्थ्यांनी वेगळ्या वाटेवरून वाटचाल करून आपली कारकीर्द घडविली अशा विद्यार्थ्यांशी मुलाखतवजा संवादाचा कार्यक्रम तसेच दिवंगत मित्र मैत्रिणींना आणि दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी व टिळकनगर विद्यामंदिरचे सध्याचे काही शिक्षक तसेच १९७६ च्या बॅचला शिकवणारे शिक्षक श्री. जगदीश भंडारे सर यांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यानंतर या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञता भावनेपोटी जमा केलेली रक्कम रु.१,५१,०००/- कृतज्ञता निधी म्हणून शाळेकडे सुपूर्द करण्यात आली व शाळेने त्यातून येणाऱ्या व्याजाचा विनियोग कसा करण्यात यावा याबद्दलची संकल्पनाही सांगण्यात आली.
त्यानंतर मान्यवरांची मनोगते झाली शाळेच्या विविध उपक्रमांची व पुढील योजनांची माहिती सर्व उपस्थितांना टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री आशीर्वाद बोंद्रे यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे करून दिली. शाळेचा आणखी एक वाखाणण्याजोगा उपक्रम म्हणजे आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी /विद्यार्थिनीनी आपापल्या क्षेत्रात विशेष नैपुण्य दाखवले आहे अशा विद्यार्थ्यासाठी एक 'वॉल ऑफ फेम' तयार केली आहे. त्यामधे या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची संक्षिप्त ओळख फोटोसहीत या भिंतीवर कायमस्वरुपी लावण्यात आली आहे ज्यातून सध्याचे विद्यार्थी स्फूर्ती घेतील. अभिमानाची गोष्ट अशी की १९७६ च्या बॅचमधील दोन विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्थान मिळवले आहे. त्या गुणी विद्यार्थ्यांचा अध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन व अंमलबजावणी अगदी जेवणा खाण्याच्या व्यवस्थेसह ही या बॅचच्या विद्यार्थ्यांनिच केली होती.
या संस्मरणीय संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल आणि एक मराठी शाळेतून ५० वर्षांपूर्वी बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पुन्हा त्याच शाळेत आठवणींना उजाळा देण्याच्या या उपक्रमाचे शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले तसेच हिरकमहोत्सवी वर्षी सुद्धा पुन्हा असेच संमेलन आयोजित करण्याचे आवाहन केले.
