उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव; “आपली सेवा, आमचे कर्तव्य” शपथ
ठाणे, दि. २८ (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अन्वये २८ एप्रिल हा दिवस ‘सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत अंजूर व ग्रामपंचायत सोनाळे तसेच शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत चेरपोली या ग्रामपंचायतींचा समावेश असून, संबंधित सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व केंद्रचालक यांना सन्मानित करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत अधिकारी हिरामण खाडे यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, शशिकांत गायकवाड, वरुणकुमार सहारे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, प्रांताधिकारी अमित सानप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, तहसीलदार सचिन चौधरी, संदीप थोरात तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी “आपली सेवा, आमचे कर्तव्य” ही शपथ घेत नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देत नागरिककेंद्री प्रशासन उभारण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक संवेदनशीलतेने कार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. तसेच ‘आदर्श आपले सरकार सेवा केंद्र’ सारख्या उपक्रमांमुळे नागरिकांना सुलभ व जलद सेवा उपलब्ध होत असल्याचे नमूद करण्यात आले.
‘सेवा हक्क दिना’च्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करण्यात आली असून, पुढील काळातही सेवा वितरणात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमामुळे सेवा हक्क अधिनियमाबाबत जनजागृती होऊन प्रशासन व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
