Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

अंधश्रद्धा, विषमता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध सत्यशोधकांचा एल्गार — कोकण विभागीय परिषद १२ एप्रिलला नवीन पनवेलमध्ये

ठाणे दि.०९: समाजातील अन्याय, अज्ञान, अंधश्रद्धा आणि वाढती सामाजिक विषमता याविरोधात वैचारिक लढा उभारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रायगड जिल्हा यांच्या वतीने कोकण विभागीय सत्यशोधक परिषद रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालय हॉल, सेक्टर-१८, नवीन पनवेल, जि. रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेचे उद्घाटन खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष माधव बावगे भूषविणार आहेत.

या परिषदेसाठी काँग्रेस प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी, विधान परिषद आमदार जयंत पाटील व बाळाराम पाटील, कामगार नेते उदय चौधरी, सी.पी.आय. नेते काळू कोमस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील पाटील, कामगार नेते अनिल जाधव, दैनिक नवे शहरचे संपादक राजेंद्र घरत, शेतकरी समाज शैक्षणिक जागृतीचे प्रणेते पी. सी. पाटील तसेच म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सुरेश ठाकूर उपस्थित राहणार आहेत.

“ज्योतिबा ते दि. बा. पाटील — वारसा सत्यशोधनाचा” या विषयावर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, शिवराज प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष रोषण पाटील आणि आगरी दर्पणचे संपादक दीपक म्हात्रे यांची विचारप्रवर्तक व्याख्याने होणार आहेत.

“सत्यशोधक विचार व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ” या विषयावर निवृत्त आयएएस अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे आणि अंनिसच्या राज्य सदस्या सुशीला मुंडे यांच्या सहभागाने विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षाची सुरुवात, दि. बा. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलेल्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

ही परिषद केवळ स्मरणापुरती मर्यादित नसून सामाजिक परिवर्तनाच्या नव्या लढ्याचा संकल्प ठरणार आहे. महात्मा फुले यांच्या समतावादी विचारांची धार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी संघर्षाची प्रेरणा आणि दि. बा. पाटील यांच्या जनआंदोलनाच्या परंपरेचा संगम घडवत समाजात न्याय, समता आणि स्वाभिमानाची ज्योत अधिक प्रखर करण्याचा निर्धार या परिषदेतून व्यक्त केला जाणार आहे.
विचारांचा वारसा कृतीत उतरविण्यासाठी आणि विवेकवादी समाजनिर्मितीच्या या चळवळीचे सहभागी होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |