ठाणे : ठाण्यातील गावदेवी भाजी मंडईत आज पहाटे साडेतीनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ठाणे महापालिकेचे सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन विभागाच्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेत तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची तातडीची मदत देण्याचा, तसेच मृतांच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्त्वावर महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
महापौर शर्मिला पिंपळोलकर, खासदार नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि प्रशासनाची ही संयुक्त बैठक झाली.
या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे साहेब, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, मुकेश मोकाशी, अभिजीत पवार यांच्यासह स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, नगरसेविका प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, नगरसेवक सुधीर कोकाटे, संजय भोईर , रमाकांत मढवी, योगेश जानकर, नम्रता कोळी, अनिल भोर आदी उपस्थित होते.
१ जून रोजी होणार भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन
या भीषण आगीत भाजी मार्केटमधील एकूण १५५ गाळेधारक बाधित झाले आहेत. या सर्व भाजी विक्रेत्यांचे तात्पुरते स्थलांतर न करता, १ जून २०२६ रोजी त्याच ठिकाणी पुन्हा पुनर्वसन करण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी साफसफाईचे काम सुरू असून, त्यानंतर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि फायर ऑडिट केले जाईल. रंगरंगोटी व विजेची कामे पूर्ण झाल्यानंतर विक्रेत्यांना त्यांचे गाळे सुपूर्द केले जातील. भाजी विक्रेत्यांच्या प्रतिनिधींनी महापालिकेच्या या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मृत आणि जखमींची माहिती
या दुर्घटनेत महापालिकेचे सुरक्षा रक्षक काळू शंकर गाडेकर (वय ५५) आणि अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी सागर सूर्यकांत शिंदे (४२) यांचा मृत्यू झाला. गाडेकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले, तर सागर शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि अवघ्या दोन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.
तसेच या घटनेत सुजित पष्टे (४५) आणि समीर जाधव (४०) हे दोन कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; विमा संरक्षणात होणार वाढ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा करून घटनेचा सविस्तर आढावा घेतला. मृतांच्या कुटुंबियांना 'मुख्यमंत्री सहायता निधी' आणि राज्य शासनाच्या आपत्कालीन विभागामार्फत मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणे, तसेच आपत्कालीन व अग्निशमन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षणाच्या (Insurance) रक्कमेत वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, सुरक्षेचा उपाय म्हणून गावदेवी भाजी मंडईत अग्निशामक यंत्रणा बसवेपर्यंत अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे तैनात ठेवण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.

