भाजप कल्याण जिल्ह्याचा अभ्यासवर्ग अलिबाग येथे उत्साहात संपन्न
कल्याण ( शंकर जाधव ) : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भारतीय जनता पक्षासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या कल्याणचे माजी नगराध्यक्ष माधवराव काणे यांच्या उल्लेखाशिवाय कल्याण भाजपचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. त्यांच्या राष्ट्रभक्ती, त्याग आणि समर्पणातून प्रत्येक कार्यकर्त्याने प्रेरणा घेतली पाहिजे,” असे प्रतिपादन भाजप नेते तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत अलिबाग येथे आयोजित भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या अभ्यासवर्गात ‘भाजपचा इतिहास आणि विकास’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते या अभ्यासवर्गाचे उद्घाटन करण्यात आले. या अभ्यास वर्गामध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल कळसेकर, सरचिटणीस आमदार माधवी नाईक यांच्याकडूनही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी नरेंद्र पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भाजपच्या स्थापनेपासून कल्याण जिल्ह्यातील संघटनात्मक जडणघडण, जुन्या काळातील कार्यकर्त्यांचे योगदान, त्याग आणि संघर्ष यावर सविस्तर प्रकाश टाकला.
कल्याणचे नगराध्यक्ष असताना माधवराव काणे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि राजकीय क्षेत्र सोडून तलासरी येथील आदिवासी भागात हिंदू सेवा संघामार्फत वसतिगृह उभारणीचे सामाजिक काम स्वीकारले. प्रतिकूल परिस्थितीतही माधवराव काणे यांनी वसतिगृहाच्या माध्यमातून अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. तसेच याच वसतिगृहाच्या माध्यमातून त्यांनी विष्णू सावरा, चिंतामण वनगा यांसारखे अनेक कार्यकर्तेही कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात तयार केले ज्यांनी भविष्यात राजकारणात भाजपचे खासदार, आमदार अशी पदे भूषवली. तर तलासरी हा त्याकाळी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला समजला जायचा. ज्यातून माधवराव काणे आणि त्यांचे सहकारी आप्पा जोशी यांच्यावर कम्युनिस्टांकडून जीवघेणा हल्लाही झाला होता. अशा संघर्षशील इतिहासातून माधवराव काणे, आप्पा जोशी यांनी आपला त्याग आणि समर्पणाच्या बळावर आदिवासी दुर्गम भागात, कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात अनेक कार्यकर्ते घडवल्याची ठळक आठवणही नरेंद्र पवार यांनी यावेळी सांगितली.
तर श्री रामजन्मभूमी आंदोलनाच्या आठवणींनाही पवार यांच्याकडून यावेळी उजाळा देण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेचा रथ कल्याणमध्ये माजी नगराध्यक्ष भगवानराव जोशी यांचे सुपुत्र नंदू जोशी यांच्या जबाबदारीवर देण्यात आला होता. विशेष म्हणजे या रथाचा चालक मुस्लिम समाजाचे डोंबिवलीतील कर्मठ भाजप कार्यकर्ते सलीम मकाणी हे होते. ही आठवण सांगत पवार यांनी भाजपच्या सर्वसमावेशक विचारांची उदाहरणे उपस्थितांसमोर मांडली.
तर डोंबिवलीचे माजी स्थायी समिती सभापती ॲड. नंदकुमार जोशी यांच्या कार्याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड न करणारे नंदकुमार जोशी यांनी आजारपणात खासगी रुग्णालयाऐवजी सामान्य नागरिक उपचार घेतात त्या शासकीय केईएम रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला होता, ही आठवण सांगताना पवार भावूक झाले.
भाजपचा इतिहास हा संघटन, त्याग, समर्पण आणि राष्ट्रसेवेवर आधारलेला आहे. आणीबाणीच्या काळात कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान आणि संघर्ष हा पक्षाच्या वाटचालीतील महत्त्वाचा अध्याय असल्याचे सांगत नरेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांना आदर्श व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा घेऊन पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
या अभ्यासवर्गात माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार निरंजन डावखरे, कल्याण पूर्वच्या आमदार सुलभाताई गायकवाड, उपमहापौर राहुल दामले, अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे, कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदू) परब, भाजपा उल्हासनगर जिल्हा प्रभारी नरेंद्र (नाना) सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस निखिल चव्हाण, रविसिंग ठाकूर, मिहिर देसाई उपमहापौर राहुल दामले, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, सभागृह नेता वरुण पाटील, शिक्षण समिती सभापती अभिजित थरवल, नगरसेवक मोरेश्वर भोईर, दिनेश म्हात्रे तसेच कल्याण जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष, सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

