Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

"अशोक भवार यांचा काव्यमुदिता कवितासंग्रह बुद्ध, धम्म, समता, करुणा आणि मानवतेचा संदेश देणारा" - नवनाथ रणखांबे यांचे प्रतिपादन

मुंबई, (  प्रतिनिधी ) : पांचपीर ट्रस्ट कार्यक्षेत्र भारत यांच्या वतीने आयोजित सार्थक साहित्य प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी अशोक भवार यांच्या ‘काव्यमुदिता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक व विचारवंत नवनाथ रणखांबे होते. यावेळी सार्थक साहित्य प्रकाशनाच्या संचालिका प्रा. आशा नवनाथ रणखांबे, पांचपीर ट्रस्टचे संचालक तथा साहित्यिक शाम परशुराम बैसाणे आणि बौद्ध विकास मंडळ पवईचे अध्यक्ष भाऊ पंडागळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आणि मानवतावादी निमंत्रित कवी संमेलन ज्येष्ठ कवी बबन सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रमणी बुद्धविहार, आयआयटी मेनगेट, पवई येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. 

ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांनी याप्रसंगी बोलताना, "कविता बाहेर येते त्यावेळी ती कविता समाजाची होते. अशोक भवार यांच्या काव्य मुदिता या संग्रहातील कविता परिवर्तनाच्या, बदलाच्या आणि धम्माच्या आहेत." असे गौरव उद्गार काढून उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

तर अध्यक्षीय भाषणात साहित्यिक तथा विचारवंत नवनाथ रणखांबे यांनी, "कवी अशोक भवार यांचा काव्य मुदिता कवितासंग्रह बुद्ध, धम्म, समता, करुणा आणि मानवतेचा संदेश देणारा विचारांचा दस्तऐवज आहे. त्यांच्या संवेदनशील लेखणीतून समाजातील वेदना, संघर्ष, प्रेम, नातेसंबंध, स्त्री-सन्मान, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक प्रबोधन यांचे चित्रण झाले आहे," असे गौरवोद्गार काढले. उपस्थित साहित्यिक, कवी आणि रसिकांना मार्गदर्शन करताना रणखांबे पुढे म्हणाले की, "साहित्य हे माणसे जोडणारे असले पाहिजे. लेखक आणि कवींनी कोण काय म्हणेल याचा विचार न करता मानवतावादी, परिवर्तनवादी आणि समाजप्रबोधन करणारे साहित्य निर्माण करावे. दर्जेदार साहित्य नेहमी वाचले जाते. त्यामुळे साहित्यिकांनी स्वतःचा वाचकवर्ग निर्माण करण्यासाठी सातत्याने लेखन, वाचन आणि चिंतन करणे आवश्यक आहे." असे प्रतिपादन करून त्यांनी कवी अशोक भवार यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

तर प्रकाशिका प्रा. आशा रणखांबे यावेळी बोलताना म्हणाल्या, "लेखकाच्या विचारांना दर्जेदार पुस्तकाचे रूप देणे ही सार्थक साहित्य प्रकाशनाची बांधिलकी आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर कार्य करत आम्ही साहित्यिकांना गुणवत्तापूर्ण प्रकाशनाची संधी उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे नवोदित आणि ज्येष्ठ साहित्यिकांनी याचा लाभ घ्यावा." तर शाम बैसाणे यावेळी बोलताना म्हणाले, "कवी अशोक भवार यांनी सामाजिक बांधिलकी आणि प्रबोधनाची परंपरा कवितांमधून जिवंत ठेवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. सार्थक साहित्य प्रकाशनाने हा कवितासंग्रह दर्जेदार बनवला आहे." यावेळी भाऊ पंडागळे यांनी अशोक भवार यांना त्यांच्या पुस्तक प्रकाशनानिमित्ताने शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस अभिनंदन केले.

पुस्तक प्रकाशनानंतर आयोजित मानवतावादी निमंत्रित कवी संमेलन जेष्ठ कवी बबन सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी मानवतावादी काव्यमंच्यावर नवनाथ रणखांबे, शाम बैसाणे, अशोक भवार, संतोष नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष आणि प्रमुख मान्यवरांसह अनंत धनसरे, धनंजय सरोदे, संदेश कर्डक, के. पुरुषोत्तम, प्रतीक कांबळे, सुरेखा गायकवाड, डॉ. सुशील बैसाणे, विकास भंडारे, वसंत हिरे, बाळासाहेब जोंधळे, वसंत वाघमारे, सुरेश घोडगे, जयलाभ धन पैठने, विश्वास कांबळे, महेश सावंत आदी. कवींनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. 

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुरेखा गायकवाड यांनी केले. मानवता, सामाजिक समता, बंधुता, प्रेम, करुणा आणि परिवर्तनवादी विचारांनी परिपूर्ण कवितांमुळे संपूर्ण सभागृह काव्यमय झाले. उपस्थित साहित्यप्रेमी आणि रसिकांनी कवींच्या सादरीकरणास उत्स्फूर्त दाद दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |