ठाणे, ५ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे हिरानंदानी इस्टेट, ठाणे येथील जैवविविधता उद्यानात शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यशाळेत मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. हा उपक्रम सर्व नागरिकांसाठी खुला ठेवण्यात आला होता.
या कार्यक्रमास महापालिका आयुक्त सौरभ राव, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज अधोरेखित करत शाडू मातीच्या मूर्तींचा वापर वाढविण्यासाठी जनजागृती करण्यावर भर दिला. पर्यावरणपूरक मूर्तींबाबत जागरूकता निर्माण झाल्यास त्यांच्या वापरात गतवर्षीच्या तुलनेत पाचपट वाढ होईल, असा विश्वास आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला.
पर्यावरणपूरक साहित्य व शाडू माती वापरणाऱ्या मूर्तिकारांना महानगरपालिकेकडून "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" या तत्त्वावर जागा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक मूर्तिकारांनी १५ जून २०२६ पर्यंत संबंधित प्रभाग समिती कार्यालयात अर्ज करावेत. प्राप्त अर्जांची छाननी करून १५ जुलै २०२६ पर्यंत उपलब्धतेनुसार जागा व शाडू माती विनामूल्य देण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या महिला बचत गटाच्या प्रयोगशाळेत मूर्तिकारांसाठी १२ टन शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी शाडू मातीपासून मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा, जनजागृती कार्यक्रम आणि पथनाट्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
जुलै २०२६ पासून शाळांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून, ऑगस्ट महिन्यापासून गृहनिर्माण संस्था व सोसायट्यांमध्ये शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी सांगितले.

