Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

कल्याणच्या प्राध्यापक-कवीचा राज्यभर गौरव; ‘कबीराचं देणं’ सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट



के. एम. अग्रवाल महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा. प्रशांत मोरे यांच्या साहित्यिक कार्याला मोठी दाद; कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा

कल्याण ( शंकर जाधव ) : कल्याण शहरासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी एक महत्त्वपूर्ण साहित्यिक कामगिरी समोर आली आहे. कल्याण येथील रहिवासी तसेच के. एम. अग्रवाल महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक आणि ज्येष्ठ कवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या ‘कबीराचं देणं’ या कवितासंग्रहाचा समावेश सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रा. मोरे यांच्या साहित्यिक योगदानाला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून कल्याणच्याचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि लाडके कवी म्हणून लोककवी अशी अनेकांच्या मनात मान्यता मिळवलेल्या साहित्यप्रेमी आणि मोरे यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे .तसेच सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वासाठी देखील हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

प्रा. प्रशांत मोरे हे गेली अनेक वर्षे अध्यापनासोबतच साहित्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. ग्रामीण जीवन, सामाजिक वास्तव, मानवी संवेदना, नातेसंबंध आणि बोलीभाषेचे सौंदर्य यांचे प्रभावी चित्रण त्यांच्या कवितांमधून आढळते. त्यामुळे त्यांची कविता वाचकांच्या मनात घर करून राहिली आहे. ‘कबीराचं देणं’ या कवितासंग्रहालाही साहित्य रसिकांकडून मोठी दाद मिळाली असून आता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळाल्याने या साहित्यकृतीला नवी उंची प्राप्त झाली आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीही प्रा. मोरे यांच्या काही कविता विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्या होत्या. मात्र, संपूर्ण कवितासंग्रह अभ्यासक्रमात समाविष्ट होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने हा सन्मान अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. विद्यार्थ्यांना मराठी साहित्याचा दर्जेदार आणि समकालीन अनुभव मिळावा, तसेच बोलीभाषेतील साहित्याची ताकद समजावी, या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रा. मोरे यांच्या साहित्याला मिळालेल्या या मान्यतेमुळे कल्याण शहरातील साहित्यिक, शिक्षक, विद्यार्थी आणि रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एका स्थानिक प्राध्यापकाच्या साहित्यकृतीला विद्यापीठीय अभ्यासक्रमात स्थान मिळणे ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून संपूर्ण कल्याण शहराच्या सांस्कृतिक वैभवाची नोंद असल्याची भावना व्यक्त होत आहे.

साहित्य, अध्यापन आणि सामाजिक भान यांचा सुंदर संगम घडविणारे प्रा. प्रशांत मोरे यांचे हे यश नवोदित लेखक, कवी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून मराठी साहित्यविश्वात कल्याणचे नाव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |